कुपोषण हा आदिवासी समाजाला लागलेला कलंक

0

नंदुरबार । अलिकडच्या काळात देज पद्धतीत वर पक्षाकडून वधू पक्षाला देण्यात येत असलेल्या रकमेत भरमसाठ वाढ होते आहे. ही वाढ आदिवासी समाजातील सामान्यांना परवडणारी नसून असा पायंडा पडल्यास तो समाजाला घातक ठरू शकतो. म्हणून देजाची रक्कम माफक रूपये 21 हजार पर्यंत मर्यादीत असावी, असा ठराव पारित करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आदिवासी समाजाला कुपोषण हा लागलेला कलंक असून शासन व प्रशासनावर कमालीची टिका करत हे कुपोषण नष्ट करण्यासाठी आता आपल्या संस्थेमार्फत समाजात प्रबोधनात्मक जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यात येतील, असे विधान स्नेहमिलन मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून बोलतांना रवींद्र वळवी यांनी केले.

मदत केंद्र कार्यान्वित करणार : कुपोषणावर मात करण्यासाठी शासनाने लागू केलेल्या योजनांवर योग्य अंमलबजावणी होत आहे काय? यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यात व गुणवत्ता वाढीसाठी सहकार्य करण्यासाठी अक्कलकुवा, मोलगी व धडगाव येथे लवकरच विद्यार्थी सहायक समिती स्थापून मदत केंद्र कार्यान्वित करण्यात येणार आहे. सदर मेळाव्याचे अध्यक्षस्थानी रवींद्र वळवी होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रमोद नाईक, दिलीप पटले, महेंद्र वसावे, एमता तडवी, अभिसिंग पाडवी, अ‍ॅड.रूपसिंग वसावे, अ‍ॅड.अभिजीत वसावे, बाबुसिंग पटले, मोजू तडवी, राहुल पटले, बहादुरसिंग वसावे, अ‍ॅड.कैलास वसावे, वनसिंग वसावे, खेतमल वसावे, सुनिल पराडके, आमशा वसावे, केशव पाडवी, गौतम पाडवी, अनिल वळवी, किसन वसावेसह परिसरातील शेकडो कर्मचारी, समाजबांधव उपस्थित होते.

देवगोई येथे संमेलन
बिरसा मुंडा आदिवासी सेवाभावी संस्था, एकता फाऊंडेशन आणि तंट्या भील युवा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हेलो दाब, देवगोई ता.अक्कलकुवा येथे आदिवासी समाज स्नेहमिलन मेळावा नुकताच संपन्न झाला. सदर मेळाव्यात आदिवासी समाजात निर्माण होत असलेल्या अनेकविध समस्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. सामाजिक जाण असलेल्या समाजासाठी काहीतरी चांगले हित संवर्धन कामी आपले योगदान देवून इच्छिणार्‍या कार्यकर्त्यांनी आपले विचार स्पष्ट केले.