सांगली । तासगावच्या कुमठ्यात अखेर बाटली आडवी झाली आहे. गावातील दारूबंदीसाठी महिलांनी राबवलेल्या मोहिमेत महिलांनी बाजी मारली आहे. दारूबंदीसाठी झालेल्या निवडणुकीत 1680 मतांचा कौल नोंदवत महिलांनी गावातून दारूची बाटली हद्दपार केली आहे. सांगलीच्या तासगाव तालुक्यातील कुमठे गावात आता दारूबंदी झाली आहे. गेल्या 1 महिन्यापासून गावातील महिलांनी दारूबंदी विरोधात मोहीम छेडली होती.
यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दारूबंदीसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. या निवडणुकीसाठी महिलांनी जोरदार मोहीम राबवली होती. यासाठी गावातील सर्वच राजकीय पक्षांनी महिलांच्या या मोहिमेला पाठिंबा जाहीर केला होता. मंगळवारी या दारूबंदीसाठी गावात मतदान पार पडले. सकाळपासून मतदानासाठी याठिकाणी मोठ्या रांगा लागल्या होत्या. एकूण 2 हजार 400 मतदार संख्येपैकी 1822 मतदान झाले.