पुणे । कर्नाटक निवडणुकीदरम्यान कुमारस्वामी आणि देवेगौडांचे फोन पवारसाहेबांना येत होते. कर्नाटक निवडणुकांचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले नसते तर भाजपची पंचायत झाली नसती. येडियुरप्पा विश्वासदर्शक ठरावासाठी सभागृहात आले होते. पण बहुमत सिद्ध करण्यास ते असमर्थ ठरले. यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला.
अडीच दिवसांचा मुख्यमंत्री होण्याचा येडियुरप्पांचा विक्रम देशातील कोणत्याही राज्याचा मुख्यमंत्री किंवा पक्ष मोडू शकणार नाही, असा उपहासात्मक टोला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला लगावला.
राष्ट्रवादीचा वर्धापन दिन आणि हल्लाबोल आंदोलनाच्या समारोपाच्या पार्श्वभूमीवर पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात आढावा बैठक पार पडली. पवार म्हणाले की, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपा बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याने काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार फोडण्यासाठी काही कोटींची ऑफर दिल्याच्या ऑडिओ क्लिप समोर आल्या. अमित शाहंना याप्रकरणी सारवासारव देखील करावे लागल्याचे त्यांनी म्हटले.
या नियोजन बैठकीत पवारांनी गुगली टाकत स्वपक्षीयांनाच क्लिनबोल्ड केल्याचे मंगळवारी बघायला मिळाले. या कार्यक्रमासाठी राज्यभरातून कार्यकर्त्यांची सोय पक्षातर्फे केली जाणार की वैयक्तिक करायची या मुद्द्यावर पवार यांनी आपली सोय आपणच करायची आहे, पक्ष काहीही करणार नाही अशा शब्दांत उत्तर दिले. इतकेच नव्हे तर निवडणुकीत तिकीट मागताना चार-पाच गाड्या भरून कसे कार्यकर्ते भरून आणता, त्यांची सोय कशी होते असे विचारताच अनेकांना तो टोला बसला आणि बैठकीत खसखस पिकली.
‘हल्लाबोल’ समारोपाला भुजबळ?
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ हे येत्या 10 जूनला पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित ‘हल्लाबोल’ आंदोलनाच्या समारोपाला उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती पवार यांनी दिली. प्रकृती अस्वास्थामुळे त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अन्याय होत असेल त्याची दखल घेतली जाईल मात्र सभागृहात पक्षाच्या विरोधात बोलणे खपवून घेतले जाणार नाही अशा शब्दात पवार यांनी नगरसेविका बाबर यांच्यासह सर्व नगरसेवकांना सुनावले. सोमवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या नगरसेवक बाबर यांनी स्वपक्षीयांचेच वाभाडे काढले होते. त्यानंतर मंगळवारी झालेल्या बैठकीत पवार यांनी या घटनेची दखल घेतल्याचे दिसून आले. इतकेच नव्हे तर त्यांनी बाबर यांच्या वक्तव्यामागील कारणेही मागवली आहेत. पक्षात अन्यायाची दखल घेतली जाईल. परंतु सभागृहात अशा गोष्टी बोलणे पक्षाला मान्य नाही. हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही अशा तिखट शब्दांत सुनावयालाही पवार विसरले नाहीत.