महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयातील धक्कादायक प्रकार; आ. गोर्हेेंसह नगरसेवकांनी आवाज उठविल्यानंतर घटनेच्या चौकशीचे आदेश
पुणे : पुण्यातील कुमारी मातांच्या प्रसुतीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कोथरूड भागात राहणार्या तरुणीला ती अविवाहीत असल्याचे कारण सांगून तिची प्रसुती करण्यास पुणे महापालिकेअंतर्गत येणार्या कमला नेहरु रूग्णालयाने नकार दिला. या घटनेनंतर आ. नीलम गोर्हे यांच्यासह सर्वपक्षीयांनी महापालिका प्रशासनाला आणि सत्ताधार्यांना धारेवर धरल्यानंतर या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. ज्या डॉक्टरांनी या महिलेची प्रसुती करण्यास नकार दिला, त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. यापूर्वीही एका कुमारी मातेला महापालिकेच्या डॉक्टरांनी प्रसुतीस नकार दिला होता. पुण्यात कुमारी मातांचे प्रमाण जास्त असून, मिळालेली लैंगिक मोकळीक हे त्याला प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे.
आयुक्तांकडून चौकशीचे आदेश
प्रसुती कळा असह्य व्हायला लागल्याने कोथरूड येथील गर्भवती तरुणीला तिच्या नातेवाईकांनी पुणे महापालिकेच्या कमला नेहरु रुग्णालयात आणले होते, मात्र डॉक्टरांनी ती अविवाहीत असल्याने प्रसुती करण्यास नकार दिला. त्यामुळे या तरुणीला तातडीने एरंडवणे येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. या रूग्णालयात तिची प्रसुती झाली आणि तिला अपत्यप्राप्ती झाली. ही घटना कळताच शिवसेना आमदार डॉ. नीलम गोर्हे व पुण्यातील काही नगरसेवकांनी आरोग्य विभागाच्या सहाय्यक अधिकारी डॉ. अंजली साबणेंची भेट घेतली आणि संबंधित डॉक्टरांवर कठोर कारवाईची मागणी केली. पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनीदेखील चौकशीचे आदेश दिले. प्राथमिक चौकशीमध्ये डॉक्टरांची चूक असल्याचे निदर्शनास आले आहे. सखोल चौकशीमध्ये हे डॉक्टर दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर करण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले.
यापूर्वी दिला होता कुमारीकेच्या प्रसुतीस नकार
महापालिकेच्या कमला नेहरु रुग्णालयाने महाविद्यालयात शिकणार्या कुमारी मातेच्या प्रसुतीला नकार दिल्याची घटनाही काही दिवसांपूर्वीच घडली होती. त्यानंतर डॉक्टर कुलदीप वाघ आणि डॉक्टर राधिका वाघ यांच्या ब्लोझम वुमन केअर सेंटरमध्ये या तरुणीची प्रसुती झाली होती. त्यात तरुणीने एका मुलाला जन्म दिला. पुण्यात घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच आ. डॉ. नीलम गोर्हे यांच्या स्त्री आधार केंद्राच्या अनिता शिंदे व विभावरी कांबळे यांनी याबाबत प्रत्यक्ष भेट घेऊन माहिती घेतली. या घटनेची महापालिका आयुक्तांकडे गोर्हे यांनी विचारणा केली होती.