नवी दिल्ली: आम आदमी पार्टीच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेले कवी कुमार विश्वास आता भाजपाच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. ते भाजपकडून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. दिल्लीतील भाजपा प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी कुमार विश्वास यांची भेट घेतली. यावरुन कुमार विश्वास आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपासोबत असतील, अशी चर्चा सध्या दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. जर, कुमार विश्वास भाजपामध्ये गेले तर त्यांना भाजपा पूर्व दिल्ली मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवू शकतो.
अरविंद केजरीवाल यांच्याशी मतभेद झाल्याने कुमार विश्वास यांना राज्यसभेची उमेदवारी नाकारण्यात आली. पक्षाच्या विविध कार्यक्रमांतही त्यांना डावलण्यात आले. त्यानंतर आता राजस्थानच्या प्रभारीपदावरून दूर करण्यात आल्याने कुमार विश्वास आणि आपमधील दुरावा आणखीच वाढल्याचे दिसून आले. याचबरोबर, गेल्या काही दिवसांपासून अरविंद केजरीवाल यांच्यावर कुमार विश्वास टीका करताना दिसत आहेत.