यवत । कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील एक रासायनिक कंपनी त्यांचे दैनंदिन वापराचे सांडपाणी टँकरद्वारे बेकायदेशीररित्या झाडांना सोडत असल्याचे ग्रामस्थांनी उघडकीस आणले आहे. या प्रकारामुळे परीसरात एकच गोंधळ उडाला आहे. एमआयडीसीतील सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र महिनाभर बंद आहे. परंतु रासायनिक कारखाने चालूच असल्याने या कारखान्यांचे दूषित सांडपाणी कोठे मुरते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले होते. 27 डिसेंबरला हे पाणी कोठे मुरते याचा शोध ग्रामस्थांना लागला आहे. येथील एक रासायनिक कंपनी ही त्याचे सांडपाणी टँकरद्वारे भरून ते झाडांना सोडत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हे सांडपाणी सोडणार्या टँकरला ग्रामस्थांनी एमआयडीसी ऑफीससमोर आणून उभे केले. ते दूषित आहे की प्रक्रिया केलेले पाणी आहे की नाही यावर नागरिकांनी शंका व्यक्त केली.
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष
एमआयडीसीतील सांडपाण्याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत, असे नागरिकांमधून बोलले जात आहे. औद्योगिक वसाहत क्षेत्रात हे सांडपाणी अजून कोठे कोठे मुरते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी कुरकुंभ येथे होणार्या दूषित सांडपाणी प्रदूषणावर गेल्या एक महिन्यापूर्वी बैठक घेऊन काही कंपनी अधिकार्यांना चांगलेच खडेबोल सुनावले होते. एक थेंब देखील उघड्यावर न सोडण्याचा आदेश संबंधित कंपन्यांना दिला होता. परंतु इथे उघड्यावर एक थेंब नाही पण टँकरच्या टँकर खाली होत असल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्हाधिकार्यांच्या आदेशाला संबंधित कंपनीने केराची टोपली दाखवली, असे संतप्त नागरिकांमधून बोलले जात आहे. जी रासायनिक कंपनी उघड्यावर सांडपाणी सोडेल त्या कंपनीवर औद्योगिक वसाहत ऑफीस व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ त्या संबंधित कंपनीवर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.