कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील कारखान्याचे दूषित पाणी रस्त्यावर

0

दौंड । कुरकुंभ औद्योगिक वसाहतील एका कारखान्यातील रासायनिक सांडपाणी थेट रस्त्यावर येत आहे. त्यामुळे संबंधित कंपनीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील एका कारख्यान्यातून गेल्या काही दिवसांपासून रासायनिक पाणी बाहेर सोडले जाते. कंपनीच्या जवळच काळ्या रंगाचे हे पाणी साचलेले दिसत असून त्याचा उग्र वास येत आहे.

प्रदूषित पाणी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाखाली असणार्‍या मोरीतून महामार्गाच्या पलिकडील बाजूस शेतजमिनीत साचत आहे. पुढे हे दूषित रासायनिक पाणी कुरकुंभ गावातील ओढ्यात जात आहे. या ओढ्यातून हे पाणी मळदच्या तलावात जात असून तेथील पाण्याचे प्रदूषण होत आहे. जल, वायू आणि ध्वनिप्रदूषण तसेच कारखान्यांमध्ये होणार्‍या दुर्घटना यामुळे कुरकुंभ, पांढरेवाडी, गिरिम परिसर धोकादायक बनला आहे. औद्योगिक सुरक्षा विभाग, तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळ कारखान्यांना नोटीस बजावतो. मात्र, पुढे कठोर कारवाई होत नसल्याचे चित्र आहे.

परिसराला धोका
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील जर्मन प्रकल्पाच्या उद्घाटनाप्रसंगी पर्यावरणपूरक शाश्वत विकासाची ग्वाही दिली होती. प्रत्यक्षात येथील परिस्थिती जैसे थे आहे. 2006 पासून प्रक्रिया केलेले सांडपाणी परिसरातच सोडले जात आहे. पावसाच्या पाण्याबरोबर हे दूषित पाणी रानोमाळ पसरत असल्याने परिसराला धोका निर्माण झाला आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारींबाबत एखादी बैठक घेऊन वेळकाढूपणा केला जातो.

पाण्याचे नमुने तपासणार
दूषित पाण्याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘नरो वा कुंजरोवा’ भूमिका घेतली आहे. मंडळाच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता, ‘दूषित पाणी नेमक्या त्याच संशयित कंपनीचे आहे, हे तुम्हाला कोणी सांगितले. दूषित पाणी त्याच कारखान्यातून येत असल्याचे आताच सांगता येणार नाही. कुरकुंभ येथील कंपन्यांतून सोडण्यात आलेल्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. तपासणीनंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल,’ असे अधिकार्‍यांनी सांगितले.