कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील दूषित पाणी उघड्यावर सोडू नये; जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

0

यवत । कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील रासायनिक प्रकल्पाच्या वाढत्या प्रदूषणाच्या विरोधात ग्रामस्थांचे वर्षानुवर्षे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला अखेर यश आले आहे. प्रदूषणाची गंभीर दखल घेत आमदार राहुल कुल यांनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. यामध्ये दौंड, पुरंदरचे प्रांताधिकारी, वनविभागाचे अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी, कंपनी मालक व प्रतिनिधी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या बैठकीत संबंधीत कंपन्यांनी सोडलेल्या दूषित सांडपाण्याचे पुरावे म्हणून फोटो जिल्हाधिकार्‍यांना दाखवण्यात आले. प्रदूषणाला आळा बसावा हीच ग्रामस्थांची मागणी आहे. हे पुरावे पाहून एमआयडीसी परीसरात कसलेही दूषित पाणी न सोडण्याचा निर्णय जिल्हाधिकार्‍यांनी घेतला.

एमआयडीसी अधिकार्‍यांना धरले धारेवर
एमआयडीसी चालली पाहीजे, की नाही त्याची जबाबदारी एमआयडीसी अधिकार्‍यांची आहे. लोकांच्या जीवापेक्षा एमआयडीसी महत्त्वाची नाही, असे जिल्हाधिकार्‍यांनी सुनावले. कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत प्रदूषणावर नियंत्रण राहील या अनुषंगाने आठवड्यातील गुरुवार व सोमवार या दोन दिवशी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे कार्यालय चालवतील, असे आदेश त्यांनी दिले. प्रांताधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व एमआयडीसी अधिकार्‍यांनी याबाबतची जबाबदारी घेऊन एक समिती करून हे रसायन मिश्रित दूषित पाणी योग्य प्रक्रिया करून वन विभागाच्या नियमानुसार रोटी येथील वनपरिक्षेत्रात सोडण्यात यावे. यासाठी तीन दिवसांच्या आत माहीती देण्याचे आदेश संबंधितांना दिला आहे.

जिल्हाधिकारी झाले निरुत्तर
कंपन्यांमधील दूषित पाण्याचा साठा आणि सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्राचा दूषित पाण्याच्या साठ्याची विल्हेवाट कशी लावावी, याबाबत ग्रामस्थांनी प्रश्‍न उपस्थित केला होता. सध्या सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्रही बंद असल्याने हा प्रश्‍न गंभीर आहे. परंतु यासंबंधात विचारलेल्या प्रश्‍नांना जिल्हाधिकार्‍यांना उत्तरे देता आली नाहीत.

ऑक्सिजन पार्क करणार
सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राने प्रक्रिया केलेले पाणी हे आमच्या रोटी परिसरातील 90 एकरात तीन भाग करून सोडण्यात यावे. ते पाणी योग्य असेल तर आम्ही हे पाणी सोडण्यास परवानगी देऊ. या वन क्षेत्रात चांगला ऑक्सिजन पार्क करून तेथे एक चांगले पर्यटन स्थळ तयार होईल, असे वनअधिकारी यांनी सांगितले.