कुरण, लांडोर बंगला परिसरात वनविभाग ठेवणार निगराणी

0

उपवनसंरक्षक जी. के. अनारसे

धुळे – जिल्ह्यातील विविध संघटनांतर्फे 31 रोजी लळिंग कुरण येथे मेळावा व इतर संभाव्य कार्यक्रमांचे पार्श्‍वभूमीवर सर्व संबंधितांनी कायदेशीर तरतुदींचे पालन करुनच या परिसरात भेट द्यावी, असे धुळे वनविभागाचे उपवनसंरक्षक जी. के. अनारसे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये म्हटले आहे. लळिंग परिसरात वनस्पती, वन्य प्राणी, पक्षी, सरिसृप, फुलपाखरे, कीटक, बांडगूळ, शेवाळ, बुरशी, सूक्ष्मजीव यासारखी जैवविविधता मोठ्या प्रमाणात असून कुरणाचा भाग असल्याने चिंकारा या हरीणवर्गीय प्राण्यांसाठीचे आश्रयस्थान आहे. या परिसरात वनांबाबत जनजागृती, विद्यार्थ्यांसाठी निसर्ग शिक्षण, पर्यावरण सचेतना, वन्यप्राणी आश्रयस्थान जोपासना, दुर्मिळ प्रजातींचे जतन होणे तसेच कुरण परिसराला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी विविध कामे करण्यात येत आहेत. निसर्ग पाऊलवाट, तण, गवत प्रजाती निर्मूलन करणे, पर्यटकांसाठी अत्यावश्यक किमान सुविधा निर्माण करणे, वनातून उपलब्ध होणार्‍या वनोपजांपासून स्थानिक लोकांना रोजगाराचे साधन निर्माती, कुरणाचे संरक्षण व संवर्धनासाठी जैविक कुंपण, पर्यटन क्षेत्र हे कुरण क्षेत्रापासून वेगळे ठेवण्यासाठी उपाययोजना, कुरण क्षेत्रात चांगल्या गवत प्रजातींची लागवडीची कामे करण्यात येत आहेत. धुळे वनपरिक्षेत्र हद्दीतील लळिंग कुरण, लांडोर बंगला राखीव वनक्षेत्र परिसरात 31 रोजी भारतीय वन अधिनियम 1972 चे कलम 26 नुसार वनात मनाई असणार्‍या कृत्यांना प्रतिबंधित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील विविध संघटनांतर्फे 31 रोजी लळिंग येथे मेळावा व इतर संभाव्य कार्यक्रमांच्या पार्श्‍वभूमीवर सर्व संबंधितांनी कायदेशीर तरतुदींचे पालन करुनच या परिसरात भेट द्यावी. राखीव वनक्षेत्रात आग पेटविणे, स्टॉल लावणे, वन्यप्राणी व वृक्षांना इजा पोहोचविणे, लाऊड स्पीकर लावणे आदी कृत्यास वन कायद्यानुसार सक्त मनाई असल्याने प्रतिबंध करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी येणार्‍या सर्व व्यक्तींनी नियमांचे पालन करुन शांततेने या क्षेत्रास 31 रोजी भेट देण्यास व एकमेकांस सद्भावना व्यक्त करण्यास हरकत नाही, असेही उपवनसंरक्षक अनारसे यांनी नमूद केले आहे.