पाटबंधारे विभागातील भोंगळ कारभाराचा फटका
निमसाखर । जोरदार पाऊस झाल्याने पाटबंधारे विभागाने वितरिका क्रमांक 36 मधून कुरवली येथील शेतीमध्ये पाणी सोडले आहे. या विभागाच्या भोंगळ कारभारामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या हलगर्जीपणाविरुद्ध नुकसान भरपाई मागणार असल्याची माहिती शेतकरी दिलीप उंडे, बबन थोरवे, पांडुरंग थोरवे, निलेश पांढरे, सुनील माने, दत्तात्रेय माने, मनोज निकम, सतीश माने, संपत माने यांनी दिली.
नीरा डावा कालव्यावरील वितरिका क्रमांक 36 मधून टेलला कुरवलीचे क्षेत्र आहे. गुरुवारी (दि. 7) रात्री कुरवली परिसरात मुसळधार पाऊस झाल्यामुळे ठिकठिकाणी शेतामध्ये पाणी साचले आहे. शेतामधील पाण्याचा निचरा कसा करायचा या विचारात असलेल्या शेतकर्यांना पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांनी पाणी आवर्तन सोडून त्रासच नाही तर नुकसान केले आहे. पाणी सोडायचे होते तर फाट्यामध्ये चारींनी सोडायला पाहिजे होते. विनाकारण शेतीमध्ये पाणी का सोडले असा सवाल शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. नीरा डावा कालव्यावरील वितरिका क्रमांक 36 मधून कुरवली परिसरात सुरू असलेले पाणी तात्काळ बंद करून झालेली नुकसान भरपाई पाटबंधारे विभागाने द्यावी, अशी मागणी यावेळी शेतकर्यांनी केली आहे.