मुबंई – मुंबईमध्ये सर्वात मोठी समस्या म्हणजे कचऱ्याची. सध्या कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. कचऱ्याचे व्यवस्थापन व्यवस्थित न झाल्याने मुंबईसाठी धोका निर्माण झाला आहे. सरकारकडून कचऱ्याचे नियोजन करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरीही कचऱ्याच्या समस्येपासून मुक्तता होताना दिसत नाही. मात्र आता यासाठी मुंबईतील सोसायट्या पुढाकार घेताना दिसत आहेत. कुर्ल्यातील कुर्ला कामगार सोसायटीमध्ये सर्वांनी एकत्र येवून झिरो कचरा व्यवस्थापन खत प्रकल्प तयार केला आहे. कुर्ल्यातील कामगार नगरमध्ये कुर्ला कामगार को-ऑपरेटिव्ह सोसायटीतील सर्वांनी एकत्र येवून शून्य कचरा नियोजन करण्याचे ठरवले आहे.
या सोसायटीमध्ये ४५४ कुटुंब असलेले रो हाऊसेस आणि ७० इमारतीमधील ३८४ कुटुंबांचा ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करून रोज या प्रकल्पात आणला जातो. यामध्ये नारळाच्या वाळलेल्या फांद्या, शिळे अन्न, खराब झालेली फळे, भाजीपाला एकत्र करून वेगवेगळ्या हाऊदामध्ये टाकला जातो. ४० दिवसात यामध्ये उत्तम प्रतीचे खत तयार होते. दररोज १० किलो खत या प्रकल्पातून तयार होते आणि ते २० रूपये प्रति किलो दराने विकले जाते. चेंबूर येथील भाभा अनुसंधान केंद्रातील संशोधकांनी हा प्रकल्प उभारण्यासाठी मोलाची मदत केली आहे. भविष्यात कचऱ्याचा भेडसावणारा प्रश्न आणि त्यातून निर्माण होणारे प्रदूषण यावर मात करण्यासाठी या सोसायटीने केलेला प्रयोग अत्यंत कौतूकास्पद आहे. सोसायटीच्या कार्याची दखल घेऊन राज्याच्या पर्यावरण विभागाने ५ लाख रुपयांचे बक्षीसही दिले आहे. स्वच्छ आणि पर्यावरणपूरक मुंबई ठेवण्यासाठी इतर सोसायटयांनाही मदत आणि मार्गदर्शन करणार असल्याचे येथील सदस्यांनी सांगतले.