कुर्‍हाकाकोड्यात 23 लाखांचा गुटखा जप्त

0

अन्न व औषध प्रशासन विभागाची सर्वात मोठी कारवाई

मुक्ताईनगर- तालुक्यातील कुर्‍हाकाकोडा गावातून तब्बल 23 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला. जळगावच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने मंगळवारी दुपारी केलेल्या या कारवाईने अवैधरीत्या गुटखा विकणार्‍या विके्रत्यांमध्ये खळबळ उडाली. कुर्‍हा येथील प्रभाग एकमधील श्री लक्ष्मी किराणा व थेरोळा रोडवरील लक्ष्मी किराणा, न्यू राठोड किराणा येथून केसर युक्त विमल पान मसाला व व्ही वन युक्त तंबाखूचा सुमारे 23 लाखांचा साठा जप्त करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
कुर्‍हा येथे गुटख्याचा मोठ्या प्रमाणावर साठा असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर मंगळवारी दुपारी 12.:30 वाजेपासून कारवाईला सुरुवात करण्यात आली. योगेश वरुणकार यांच्या राठोड किराणा सेंटरमधून आठ हजार 404 रुपयांचा विमल गुटखा जप्त करण्यात आला तर तेथूनच जवळ असलेल्या प्रदीप पुरी गोसावी यांच्या लक्ष्मी किराणा दुकानातून अंदाजे 22 लाख 28 हजार किंमतीचा विमल केसर युक्त पान मसाला व व्ही वन सुगंधित तंबाखू गुटखा जप्त करण्यात आला. आतापर्यंत झालेली ही सर्वाधिक मोठी कारवाई असल्याने अवैधरीत्या गुटखा विकणार्‍या विक्रेत्यांमध्ये खळबळ उउाली आहे. अन्न व पुरवठा अधिकारी अनिल गुजर, विवेक पाटील, सुवर्णा महाजन, तसेच वाय.के.बेंडकुळे, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन जळगाव विभागातील अधिकार्‍यांनी ही कारवाई केली.