कुर्‍हाडीच्या धमकीने चार लाखांचा ऐवज लूटला

0

धरणगाव । येथील चिंतामणी मोरया नगरात आज दुपारी दिवसाढवळ्या पडलेल्या दरोड्यामुळे शहरात दहशत पसरली आहे. दरोडेखोरांनी घरात पुरुष कोणीच नाही, फक्त महिला असल्याचे हेरुन त्यांना कुर्‍हाडीच्या धाकाने धमकावत साडेचार लाखांचा ऐवज हिसकावून नेला. विशेष म्हणजे जीवाच्या भीतीने या दोन महिलांनी स्वतःच कपाट उघडून दागीणे व रोख रक्कम दरोडेखोरांच्या हवाली केली.

ही घटना घडत असतांना गल्लीत किंवा परिसरात कुणालाच सुगावा लागला नाही किंवा संशयही आला नाही याबद्दल चर्चा सुरु असली तरी जीवाच्या भितीने घरातील महिला ओरडू शकल्या नाहीत किंवा दरोडेखोरांचा प्रतिकार करु शकल्या नाहीत.

दोन दरोडेखोर मोटारसायकलवरुन आले
धरणगावातील चिंतामणी मोरया नगरातील रहिवाशी पुष्पक ओंकार नारखेडे यांचा हा प्रशस्त बंगला आहे. दुपारी हा दरोडा पडला तेव्हा घरात एकही पुरुष नव्हता त्यामुळे या घरातील पुरुषांच्या हालचालींची माहिती घेवून चोरट्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवली असावी. दुपारची नेमकी पुरुष मंडळी घरात नसल्याची वेळ साधून त्यांनी हा डाव साधला त्यामुळे दरोडेखोर परिसरातीलच किंवा या शहराची माहिती असलेले असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे. मोटारसायकलवरुन आलेल्या या दोन दरोडेखोरांनी रुमालाने त्यांचे चेहरे पूर्ण झाकलेले होते. त्यांच्याजवळ फक्त कुर्‍हाडी होत्या अन्य शस्त्रे नव्हती. घरात प्रवेश करताच त्यांनी घरातील दोन महिलांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि महिलांशिवाय तिसरी व्यक्ती घरात नसल्याचा अंदाज घेतला. धमकावल्यावर या महिला प्रतिकार करु शकत नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी महिलांनाच जो असेल तो ऐवज आणून द्या असा दम भरला. त्यामुळे कपाट किंवा अन्यत्र कुठेही दरोडेखोरांच्या बोटाचे ठसे सहज मिळविणे पोलिसांना शक्य नव्हते. पोलीस निरिक्षक वाघमारे यांनी पथकासह घर व परिसराची पाहणी केली. 22 तोळे सोने व एक लाख 85 हजार रुपये रोख दरोडेखोरांनी हिसकावून नेेल्याचे सांगण्यात येत होते. सुनंदा पुष्पक नारखेडे यांच्या फिर्यादीवरुन सायंकाळी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. या दरोड्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली असून तपासासाठी धागेदोरे मिळविणे हे पोलिसांपुढचे खरे आव्हान आहे.