भुसावळ/पाचोरा : जळगाव येथे मुलीला भेटण्यासाठी दुचाकीने निघालेल्या पाचोरा तालुक्यातील कुर्हाड येथील शेतकर्याचा भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. कुर्हाड बुद्रुक ते म्हसास दरम्यान ही घटना घडली. याबाबत पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अनिल शांताराम चौधरी (46) असे मयताचे नाव आहे.
मुलीला भेटण्यासाठी जाताना दुर्घटना
अनिल चौधरी हे मुलीची प्रसुती झालेली असल्याने तिला जळगांव येथे भेटण्यासाठी जात असतांना कुर्हाड बु ते म्हसास दुचाकीने जात असतांना बुधवारी 9 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने येणार्या चार चाकी वाहनाने जोरदार धडक दिली. यावेळी गंभीर जखमी झाले होते. त्यांना गावातील काही नागरिकांनी उपचारासाठी पाचोरा येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी मयत घोषीत केले. मयतावर गुरुवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत अनिल चौधरी हे नामांकित पहिलवान होते. ते शेती व्यवसाय करून गरांचा व्यापार करीत होते. गेल्या वर्षीच त्याचा मोठा भाऊ सुनील यांचे निधन झाले होते. मयताच्या पश्चात वृद्ध आई, एक भाऊ, पत्नी, दोन मुली व मुलगा असा परीवार आहे. धडक देणारा वाहन चालक आपल्या वाहनासह पसार झाला असून घटनेप्रकरणी अज्ञात वाहन धारकाविरुद्ध पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनमध्ये अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.