मुक्ताईनगर। तालुक्यातील कुर्हाकाकोडा येथील जिल्हा बँकेची इमारत जीर्ण झाली असून ग्राहकांना उभे राहण्यासाठी पुरेशी जागा सुध्दा उपलब्ध नसते. त्यामुळे लवकरच या बँकेचे नवीन इमारतीचे बांधकाम सुरु करणार असल्याचे आश्वासन जिल्हा बँकेच्या चेअरमन अॅड. रोहिणी खडसे खेवलकर यांनी कुर्हा येथील शाळेला भेट दिली त्यावेळी दिले. नुकतीच जिल्हा बँकेच्या चेअरमन अॅड. रोहिणी खडसे खेवलकर यांनी जेडीसीसी बँक शाखा कुर्हा येथे भेट दिली.
जिल्हा बँक ग्राहकांसोबत साधला सुसंवाद
भाजपा ज्येष्ठ नेते कमलकिशोर गोयनका, बोदवड बाजार समितीचे सभापती निवृत्ती पाटील, तालुकाध्यक्ष दशरथ कांडेलकर, सरपंच ओमप्रकाश चौधरी, तालुका सरचिटणीस डॉ. बी.सी. महाजन, राजकुमार खंडेलवाल, रमेश खंडेलवाल, मनिष गोयनका, सुरेश काळे, सुनिल काटे आदी उपस्थित होते. याप्रसंगी रोहिणी खडसे खेवलकर यांनी जिल्हा बँकेच्या ग्राहकांसोबत संवाद साधला. बँकेच्या ठेवींची माहिती जाणून घेवून कारोभाराबाबत माहिती घेतली व बँकेच्या वास्तुची पाहणी केल्यानंतर त्यांनी सांगितले. नवीन वास्तुला लवकरच सुरुवात करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी बँकेचे व्यवस्थापक एम.डी. खराटे यांच्या कामगिरीचे कौतुक केले. कॅशियर दिनकर वानखेडे, लिपिक एन.जी. मोहाळे, आर.पी. संभारे, अतुल गोडे, सागर भोजने उपस्थित होते.