मुक्ताईनगर : तालुक्यातील कुर्हा गावात चेारट्यांनी दोन दुकाने फोडत सुमारे दोन लाखांची रोकड लांबवली. या घटनेने व्यापार्यांसह नागरीकांमध्ये खळबळ उडाली. बुधवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी काम फत्ते केले. कुर्हा येथे बुधवारी पहाटे तीन वाजता दिनेश जैस्वाल यांच्या अंबिका ट्रेडर्स या दुकानातून 43 हजारांची तसेच कापूस व्यापारी सुमित चौधरी यांच्या दुकानातून एक लाख 55 हजार रुपयांची रोकड लांबवण्यात आल्याचे सांगण्यात आले. दुकानावरील माणसे सकाळी दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर त्यांना दुकान फोडण्यात आल्याचे कळाल्यानंतर पोलिसांना माहिती कळवण्यात आली. एका दुकानात चोरी करतान चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. चोरट्याने डोक्यावर टोपी तसेच तोंडाला रूमाल बांधल्याचे दिसून आले. कुर्हाकाकोडा दूरक्षेत्रात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. चोरीनंतर श्वान पथकासह ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. वसंतराव कांबळे, पोलीस उपनिरीक्षक सचिन डोंगरे, विनायक पाटील यांनी चोरी झालेल्या ठिकाणाची पाहणी केली. तपास मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे सहा.निरीक्षक माणिक निकम करीत आहेत.