कुर्‍हा येथील सेंट्रल बँकेची शाखा विविध समस्यांनी ग्रस्त

0

मुक्ताईनगर। तालुक्यातील कुर्‍हा परिसरातील एकमेव राष्ट्रीयकृत बँक असलेल्या सेंट्रल बँक शाखेत कर्मचारी व अधिकारी यांचा मनमानी कारभार सुरू असल्याने ग्रामस्थ अनेक समस्यांनी त्रस्त आहेत. ग्राहकांना कर्मचार्‍यांकडून असभ्य वागणूक मिळत असून महिला व वृद्धांची कुचंबणा होत असल्याने वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची मागणी ग्राहकांकडून होत आहे.

बंद एटीएममुळे पैसे काढण्यासाठी ग्राहकांचे हाल
या बँकेला कुर्‍हा वडोदा परिसरातील आजूबाजूचे 32 खेडेे जोडण्यात आले आहे. शासनाच्या विविध योजनांचे लाभार्थी व विद्यार्थी व असंख्य नागरिकांचे याच बँकेत खाते आहे. एकमेव राष्ट्रीयकृत व एकमेव शाखा असलेली सेंट्रल बँक आहे. त्यामुळे परिसरातील ग्राहक मोठ्या प्रमाणात येथे येत असल्याने ग्राहकांची मोठी गर्दी राहते. मात्र बँकेच्या अधिकार्‍यांकडून ग्राहकांना सुविधा न मिळता असभ्य वागणूक मिळत आहे. ग्राहकांशी उर्मटपणे बोलून हाकलून देण्याचा प्रकार सुरू आहे. तसेच बँकेत दलालांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आशिक्षित ग्राहकांकडून पैसे उकळण्याचा धंदा दलालांनी मांडला आहे. नोटबंदीपासून एटीएम मशीन बंद असल्याने ग्राहकांना पैसे काढण्यासाठी बँकेत रांग लावावी लागत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. मोठ्या प्रमाणात बँकेच्या समस्या असतांना स्थानिक पुढारी अनभिज्ञ आहे. कुर्‍हा परिसरात मोठ्या प्रमाणात सुशिक्षित बेरोजगार व लहान-मोठे उद्योग करणारे व्यावसायिक आहेत शासनाने मुद्रा लोन योजना अंमलात आणली मात्र कुर्‍हा शाखा व्यवस्थापकाकडून होतकरु बेरोजगारांना मुद्रा लोन देण्यासाठी टाळाटाळ केली जात असून मर्जीतल्या लोकांना साटे- लोटे करुन कर्ज दिले जात असल्याचा उघड आरोपही नागरिकांमधून होताना दिसतो.

बँकेत मोठ्या प्रमाणात ग्राहकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. देशात कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असताना बँकेत सुरु असलेला हा प्रकार म्हणजे शोकांतिका आहे. बँके विषयी वरिष्ठ पातळीवर तक्रारी केल्या आहेत.
ओमप्रकाश चौधरी, सरपंच, कुर्‍हा

पावसाळ्यामुळे शेतकरी वर्गांचे शेतात राबण्याचे दिवस असतांना तसेच शेतकर्‍यांना खते खरेदी, मजुरांची देणी देण्यासाठी पैशांची गरज भासत आहे. अशात स्वतःच्या पैशासाठी तास न् तास बँकेच्या रांगेत उभे राहावे लागते. त्यानंतरही शेतकर्‍यांना निराश होऊन परतीचा मार्ग अवलंबावा लागत आहे.
शंकर मोरे, सामाजिक कार्यकर्ता