भुसावळ। तालुक्यातील कुर्हे पानाचे आणि परिसरातील गावांना वीजपुरवठा करण्यासाठी महावितरण कंपनीने 33 बाय 11 केव्ही उपकेंद्राची निर्मिती केली आहे. अल्पावधीच या सबस्टेशनची उभारणी पूर्ण करण्यात आली. या केंद्राला आता वीजपुरवठा करुन पहिली चाचणी घेण्याचे काम सुरु करण्यात येणार आहे. यामुळे कुर्हे पानाचेसह वराडसीम आणि परिसरातील गावांना शाश्वत विजपुरवठा करण्यात येणार आहे.
सुरळितपणे विजपुरवठा होणार
महावितरण कंपनीच्या चोरवड उपकेंद्रातून कुर्हे आणि परिसराला विजपुरवठा केला जात होता. मात्र सातत्याने तांत्रिक अडचणींमुळे वीजपुरवठ्यामध्ये खंड निर्माण होत असल्याने नागरिकांची ओरड वाढली होती. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महावितरण कंपनीच्या पायाभूत आराखडा दोन मधून कुर्हे पानाचे येथे स्वतंत्र 33 बाय 11 केव्हीचे उपकेंद्र मंजूर करण्यात आले.
चाचणी पूर्ण करुन केंद्र कार्यान्वित
आमदार संजय सावकारे यांनी यासाठी प्रयत्न केले. अल्पावधीतच हे काम पूर्ण करण्यात आल्याने आता थेट चाचणी घेवून हे केंद्र कार्यान्वित करण्यात येणार आहे. चोरवड उपकेंद्रातून वीजपुरवठा होत असलेल्या कुर्हे परिसरात शाश्वत वीजपुरवठा मिळत नसल्याची स्थिती होती. मात्र आता स्वतंत्र सबस्टेशनमुळे वीजपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
खबरदारी राखण्याचे आवाहन
उपकेंद्राला 33 केव्ही कुर्हा वाहिनीवर खेडी, खेडी शिवार, कुर्हे शिवार, कुर्हे गाव, 11 केव्ही कुर्हा एजी वाहिनीवर कुर्हे पानाचे गाव, 11 केव्ही कुर्हा गावठाण लाईनवर कुर्हे पानाचे गाव आणि 11 केव्ही वराडसीम एजी लाईनवर कुर्हे पानाचे शिवार कुर्हे पानाचे एजी आदी गावे समाविष्ट केली जाणार आहेत. या सर्व लाईन वीजभारीत होणार असल्याने नागरिकांनी गुरे खांबांना तसेच ताणांच्या तारांना बांधू नयेत, लाईनच्या खालील भागातही काळजी घ्यावी तसेच विज वाहिनीला स्पर्श होईल अशा उंच वस्तूंची वाहतूक करु नये, असे आवाहन महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे. कुर्हे पानाचे येथील सबस्टेशनच्या 33 केव्ही आणि 11 केव्ही विजवाहिन्यांमध्ये वीजभार सुरु करण्यात आला. लवकरच चाचणी पूर्ण होणार आहे. चाचणीनंतर तत्काळ हे केंद्र सुरु केले जाईल.