कांदे खांडणीदरम्यान घटना ; जमावाच्या सतर्कतेमुळे बिबट्याची धूम
भुसावळ- तालुक्यातील कुर्हेपानाचे शिवारातील शेतात कांदे खांडणीचे काम सुरू असताना अचानक बिबट्याने शेतमजूर तरुणावर हल्ला चढवल्याची घटना शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडल्याने खळबळ उडाली आहे. याचवेळी शेतातील मजूरांनी आरडा-ओरड केल्याने बिबट्या एका शेतात दडून बसला तर वनविभागाला माहिती कळवल्यानंतर वनविभागाने बिबट्याचा रस्ता मोकळा करून दिल्यानंतर बिबट्याने धूम ठोकल्याने अप्रिय घटना टळली. बिबट्याच्या हल्ल्यानंतर शेतकरी, शेतमजुरांमध्ये घबराट पसरली असून वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पुढे आली आहे.
बिबट्याच्या हल्ल्याने पसरली दहशत
कुर्हेपानाचे शिवारात शेतकरी मनोज चिंधू बारी यांचा पानाचा मळा असून त्यांनी लगतच कांद्याची लागवड केली असून शुक्रवारी दुपारी मजुरांकरवी कांदे खांडणीचे काम सुरू असताना अचानक बिबट्याने दीपक भील (30) या तरुणावर हल्ला चढवला मात्र तरुणाने सतर्कता दाखवल्याने बिबट्याचे नखे तरुणाच्या हाताला तसेच पोटाला स्पर्श करून गेल्याने किरकोळ जखमा झाल्या तर बिबट्याला पाहताच उपस्थितांमध्ये चांगलीच भंबेरी उडाली. मजुरांनी जोर-जोरात आरडा-ओरड केल्याने काही कळण्याआत आठ फूट उंच उडी मारून बिबट्याने पलिकडील शेतात शिरला तर बिबट्या आल्याची माहिती कळताच जमाव मोठ्या संख्येने जमला. याबाबतची माहिती कुर्हे वनविभागाला मिळताच वनरक्षक एस.आर.चिंचोले व कुर्हा वनविभागाच्या कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वनविभागाच्या कर्मचार्यांनी गर्दी बाजूला करीत बिबट्याला वाट मोकळी करून दिल्याने त्याने धूम ठोकली.
शेतकर्यांनी सतर्कता बाळगावी -आरएफओ बच्छाव
या परीसरात बिबट्याचा वावर असून शेतकर्यांनी शक्यतो रात्री व पहाटेच्या वेळी एकटे न फिरता जमावासोबतच जावे. शुक्रवारी बिबट्याला शिकारी व पाण्यासाठी आला असण्याची अधिक शक्यता आहे. वनविभाग आता रात्रीची गस्त वाढवणार असून नागरीकांच्या मनातील भीती कमी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आरएफओ आशुतोष बच्छाव म्हणाले.
निमखेडी बुद्रुक शिवारातही वाघाचे दर्शन
मुक्ताईनगर- तालुक्यातील निमखेडी बुद्रुक शेती शिवारात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पट्टेदार वाघाचे दर्शन शेतकर्यांना होत असून वन विभागाने शेतकर्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तालुक्यातील निमखेडी बुद्रुक शेती शिवारात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून एक पट्टेदार वाघ फिरत असल्याची चर्चा शेतकर्यांमध्ये सुरू होती. 26 डिसेंबर रोजी दुपारी संजय भास्कर चोपडे यांच्या शेत-शिवारातील गट नंबर 157 मध्ये पट्टेदार वाघासह लहान बछड्याला त्यांनी प्रत्यक्ष पाहिले. विशेष म्हणजे प्रशांत कांडेलकर यांच्या शेतातच केळी पिकात वाघाचे वास्तव्य असल्याचे निदर्शनास आले आहे. बुधवारी दुपारी वाघांने रानडुक्कराची शिकार करून फस्त केल्याचे देखील प्रत्यक्षदर्शी शेतकर्यांनी सांगितले. या संदर्भात वडोदा वनविभागाचे वनक्षेत्रपाल अमोल चव्हाण यांच्याशी विचारणा केली असता वाघ दिसून आल्याचे त्यांनी मान्य केले. तसेच वाघाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ट्रॅप कॅमेरा देखील परीसरात लावलेले असल्याचे त्यांनी सांगितले.