कुर्‍ह्यातील जिनींगला आग : कर्मचार्‍याच्या सतर्कतेने अनर्थ टळला

0

भुसावळ : तालुक्यातील कुर्‍हेपानाचे गावाजवळील सुशीला जिनिंग-प्रेसिंग मिलला बुधवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास विजेच्या लपंडाव सुरू असतानाच आग लागली मात्र सुदैवाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळाल्याने अनर्थ टळला. मिलच्या मशीन क्रमांक तीनवर काम सुरू असताना कापूस वाहून नेणार्‍या कन्व्हेअर बेल्टला ही आग अचानक लागली परंतु कर्मचार्‍याच्या सतर्कतेमुळे लागलीच आग आटोक्यात अली. आगीबाबत नरपालिकेच्या अग्निशमन दलाला फोनवरून माहिती कळविल्याने नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे वसंत पाटील, विजय येवले, विजय ननवरे घटनास्थळी पोहोचले परंतु तोपर्यंत कर्मचार्‍यांनी आग आटोक्यात आणून विजवली.
विजेचा लपंडाव सुरू असल्याने मशीन क्रमांक तीनवर लोड वाढल्याने ही आग लागल्याचा अंदाज आहे मात्र निश्‍चित कारण कळू शकले नाही. कर्मचार्‍यांनी वेळीच सर्तकता दाखवली नसती तर मिलच्या आवारात कापसाचे मोठे ढीग पडल्याने आगीने रौद्र रूप धारण केले जाण्याची शक्यता आहे. जिनिंग मिलच्या बाहेर रस्त्यावर कापसाच्या भरलेल्या ट्रॅक्टरच्या रांगापर्यंत चुकीची आगीची ठिणगी उडाली असती तर मोठी हानी होण्याची शक्यता होती.