कुलकर्णीनंतर देशपांडे!

0

हडपसर : व्यावसायिक गाळा घेण्यासाठी सहा वर्षांपूर्वी पैसे भरूनही गाळा ताब्यात दिला नाही. तसेच, या गाळ्याचे बांधकाम न करता त्याच जागेच्या शेजारी दुसरी इमारत बांधून जादादराने गाळेविक्री करणार्‍या सिटी कार्पोरेशन लि. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे यांच्यासह चार जणांविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात लष्कर न्यायालयाच्या आदेशानुसार विश्‍वासघात, फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बिबवेवाडी येथील गणेश चौधरी यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केलेली आहे. डी. एस. कुलकर्णी यांच्याकडून ठेवीदारांचे पैसे परत न दिले गेल्याने फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले असतानाच, पुण्यातील हे आता दुसरे प्रकरण चव्हाट्यावर आले आहे.

सात लाख घेतले, गाळाच दिला नाही!
या फसवणूकप्रकरणी मगरपट्टा येथील सिटी कार्पोरेशन लि. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे (48, अमोनोरा पार्क, मगरपट्टा) यांच्यासह कंपनीतील प्रसाद उबाळे, अतुल गोगावले, दीपक जाधव यांच्यावर हडपसर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. गणेश लछाराम चौधरी (वय 28, रा. बिबवेवाडी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. हडपसर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विश्‍वजित खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश चौधरीने दिनांक 24 नोव्हेंबर 2011 रोजी सिटी कार्पोरेशनच्या बिल्डरला 8 हजार चौरस फुटाने 7 लाख 20 हजार रुपये देऊन 28 नंबरचा गाळा बुक केला होता. मात्र बिल्डरने बांधकाम केले नाही. दिलेली रक्कमही परत दिली नाही. मात्र आता त्याच जागेच्या शेजारी नवीन इमारत उभी करण्यात येत आहे. त्यामधील गाळ्याची किंमत 30 हजार चौरस फुटाने बिल्डर विक्री करत आहे. मात्र आता बिल्डर जुन्यादराने गणेश चौधरी यांना पैसे देत आहे.

लष्कर न्यायालयाचे गुन्हा नोंदविण्याचे आदेश
आम्ही बुक केलेल्या गाळ्याशेजारील जागेमध्ये बिल्डर नवीन दुसरी इमारत उभी करत असून, त्यातील गाळा जादादराने विकत आहे. आम्हाला मात्र जुन्या दराने पैसे घ्या, असे म्हणत असल्याचे फिर्यादीत गणेश चौधरी यांनी म्हटले आहे. चौधरी यांनी न्यायालयात धाव घेतल्यामुळे लष्कर न्यायालयाने सिटी कार्पोरेशन लि. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे यांच्यासह प्रसाद उबाळे, अतुल गोगावले, दीपक जाधव यांच्यावर विश्‍वासघात व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश हडपसर पोलिस ठाण्याला दिले आहेत. यानुसार हडपसर पोलिस ठाण्यात ग्राहकाचा विश्‍वासघात व फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचप्रमाणे दुसरे ग्राहक राजेश अशोक चौधरी यांनीही 29 नंबरचा गाळा बुक केला होता. त्यांनाही बिल्डर जुन्या दराने पैसे देत आहे. त्यामुळे राजेश चौधरी यानेही विश्‍वासघात व फसवणूक झाल्याचा गुन्हा हडपसर पोलिस ठाण्यात दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास हडपसर पोलिस करीत आहे.