कुलगुरु आणि विद्यापीठावरील आरोप पुर्वग्रहदुषित

0

जनसंपर्क अधिकारी डॉ. सुनील पाटील यांचा खुलासा


जळगाव: नुतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य एल.पी.देशमुख यांच्याबाबत तक्रारदार पीयूष पाटील यांनी विद्यापीठाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र त्यांनी महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाकडे द्यायला पाहिजे होत्या. तसेच कुलगुरुंनी तडजोड करुन प्रकरण मिटवून टाका, असे कोणतेही वक्तव्य करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. विद्यापीठावर केलेले आरोप हे पूर्वग्रहदूषित भावनेने केलेले असून, विद्यापीठाची व कुलगुरुंची प्रतिमा मलिन करणारी आणि जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणारी आहे. अशा आशयाचा खुलासा कवयित्री बहिणाबाई चौध़री उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. सुनील पाटील यांनी केला आहे.

प्रसिध्दीस दिलेल्या खुलाशात म्हटले आहे की, तक्रारदार पीयूष पाटील यांनी नुतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य एल.पी.देशमुख यांच्याबाबत विद्यापीठाकडे तक्रारी दिल्या हे त्यांचे म्हणणे बरोबर आहे. परंतु विद्यापीठाच्या प्रचलित परिनियमातील तरतूदीनुसार आणि विद्यापीठ कायद्यानुसार महाविद्यालयाच्या प्राचार्यांसंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यास त्याची चौकशी व शहनिशा करण्याचे सक्षम प्राधिकरण संबंधित महाविद्यालयाचे व्यवस्थापन असते.पियुष पाटील यांनी महाविद्यालयासंदर्भात तक्रार त्या महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाकडे द्यायला हवी होती आणि तशी कायदेशीर वस्तूस्थिती समजावून देण्यात आली होती. विद्यापीठाकडे त्यांनी केलेल्या तक्रारी या महाविद्यालयीन व्यवस्थापनाकडे पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव पाठविण्याबाबत विद्यापीठाच्या कायदाविभागाकडून अभिप्राय प्राप्त झाला आहे. त्यानुसार विद्यापीठ कार्यवाही करीत आहे.वरील कायदेशीर तरतूद असतांना कुलगुरुंनी तडजोड करुन प्रकरण मिटवून टाका असे कोणतेही वक्तव्य करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तसे कोणतेही वक्तव्य कुलगुरुंनी केलेले नाही. प्राचार्य एल.पी.देशमुख हे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर लोकशाही पध्दतीने प्राचार्य गटाचे प्रतिनिधी म्हणून निवडून आलेले आहेत. पियुष पाटील यांची मागणी संयुक्तिक नाही.