पुणे । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आरोग्य केंद्र आणि परीक्षा व मुल्यमापन मंडळाच्या कार्याविरुद्ध प्रश्नचिन्ह उपस्थित करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) तिरडी आंदोलन आणि रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेने भीक मांगो आंदोलन करून विद्यापीठ परिसर मंगळवारी दणाणून टाकला. कुलगुरु हाय हाय, या कुलकगुरुंचे करायचे काय खाली डोके वर पाय, दुधगावकर को हटाव अशा आक्रमक घोषणा देऊन विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाला प्रलंबित प्रश्नांबाबत निर्णय घेण्यासाठी भाग पाडले.
विद्यापीठातील अद्ययावत आरोग्य केंद्रात सोयीसुविधा वाढव्यात, केंद्राला अॅम्बुलन्स सेवा मिळावी आणि आरोग्यप्रमुख डॉ. शशिकांत दुधगावकर यांची हकालपट्टी व्हावी अशी मागणी यावेळी अभाविपने केली. तर, रिपाई विद्यार्थी परिषदेने रुग्णवाहिकेच्या मागणीसह परीक्षा व मूल्यमापन विभागातील कर्मचार्यांची पुनर्मूल्यांकनातून गुणवाढ प्रकरणी सीआयडी चौकशी करण्याची मागणी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांना केली. यावेळी दुधगावकर आणि कुलगुरूंविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ऐश्वर्या भणगे, सागर काळे, शशिकला पावरा याप्रसंगी उपस्थित होते.
आरोग्य सेवेसाठी तिरडी आंदोलन
विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रात विद्यार्थ्यांसाठी पुरेशा प्रमाणात सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या केंद्रात उपलब्ध असलेला साठा मुदतबाह्य आहे. तसेच आप्तकालीन वेळी विद्यार्थ्यांसाठी रुग्णवाहिकेची सोय देखिल नाही. तसेच केंद्रात 24 तास ओपीडीची सुविधा उपलब्ध नसून डॉ. दुधगावकर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेत नाही. या सर्व कारणांसाठी तिरडी आंदोलन करण्यात आल्याची माहिती अभाविप प्रदेश महामंत्री राम सातपुते आणि विद्यापीठ अध्यक्ष श्रीराम कंधारे यांनी दिली.
कुलगुरुंना खेळण्यातील रुग्णवाहिकेची भेट
रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेने राष्ट्रीय निमंत्रक मंदार जोशी यांच्या नेतृत्वात आरोग्य केंद्राचा दर्जा सुधारण्यासाठी अन् रुग्णवाहीका घेण्यासाठी भीक मांगो आंदोलन केले. यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात अॅम्बुलन्स घेण्यासाठी पैसे जमा करण्यात आले. तसेच, जमा झालेलेली भीक आणि प्रतिकात्मक स्वरुपातील खेळण्यातील रुग्णवाहिका डॉ. करमळकर यांना भेट देण्यात आली. परीक्षा व मूल्यमापन विभागातील कर्मचार्यांची पुनर्मूल्यांकनातून गुणवाढ प्रकरणी सीआयडी चौकशी करावी, अशी मागणी देखिल यावेळी करण्यात आली. तसेच सर्व मागण्या मान्य न झाल्यास सरकार विरुद्ध तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी परिषदे तर्फे देण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष राहीत कांबळे, सरचिटणीस सुरज गायकवाड, अॅड. चित्रा जानगुडे, वैभव पवार, राजू थापा, विजय नडगेरी, गणेश कांबळे, निहाल कांबळे आदी उपस्थित होते.
बनारस लाठी हल्ल्याविरोधात कुलुगुरुंना निवेदन
बनारस हिंदू विद्यापीठात विद्यार्थिनींवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या विरोधात नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडियातर्फे (एनएसयूआय) विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांना मंगळवारी निवेदन देण्यात आले. तर, स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियासह (एसएफआय) अनेक पुरोगामी संघटनांनी अनिकेत कॅन्टीनजवळ निषेध सभा घेऊन झालेल्या प्रकाराचा तीव्र शब्दांमध्ये निषेध नोंदविला. बनारस हिंदू विद्यापीठात घडलेला प्रकार राज्यातील विद्यापीठांमध्ये घडू नयेत आणि विद्यापीठांमध्ये विद्यार्थीनींची सुरक्षेची काळजी घेण्यात यावी, यासाठी राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंना निवेदने देण्यात आली. त्याचाच भाग म्हणून डॉ. करमळकर यांना निवेदन देण्यात आल्याचे एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष अमिर शेख यांनी सांगितले.
चार डॉक्टर व परिचारीकांची नियुक्ती करणार
विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रात येत्या काही दिवसात चार डॉक्टरांची आणि त्याच प्रमाणात परिचारीकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अॅम्बुलन्स खरेदी करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून लवकरच ती केंद्रात दाखल होईल. याबाबतचे निर्णय मॅनेजमेंट कौन्सिलमध्ये घेण्यात आले आहेत.
-डॉ. नितीन करमळकर, कुलगुरु