कुलभूषण जाधवांच्या शिक्षेचे परिणाम भोगण्यासाठी तयार- पाक मीडिया

0

इस्लामाबाद : भारतीय नौसेनेतील माजी अधिकारी कुलभूषण जाधवांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर पाकिस्तानी मीडियाला प्रचंड आनंद झाला आहे. कुलभूषण जाधव यांना न्यायालयाने फाशीच्या शिक्षेचा दिलेला निर्णय हा अभूतपूर्व असल्याचा पाक मीडियाने म्हटले आहे.

तसेच तज्ज्ञांच्या मते, या कृतीमुळे पाकिस्तानचे राजकीयदृष्ट्या वजन वाढले आहे. पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने हेरगिरी केल्याचा ठपका ठेवत जाधवांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर पाकिस्तानी मीडियानेही या शिक्षेचे जोरदार समर्थन करणे सुरूच ठेवले आहे. पाकिस्तानमधील इंग्रजी भाषेतील वृत्तपत्र असलेल्या द नेशनने पहिल्या पानावर हेरगिरी करण्यासाठी मृत्यू ही शिक्षा असल्याचे वृत्त छापले आहे.

राजकीय आणि संरक्षण विश्‍लेषक डॉ. हसन अन्सारी यांच्यामते, या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील तणावामध्ये वाढ होणार असून, पाकिस्तानने या गुन्ह्यासाठी गंभीर शिक्षा दिल्याचेही द नेशनने छापले आहे. हेरगिरी आणि विघातक कृत्ये केल्याचा आरोप ठेवून वर्षभरापूर्वी बलुचिस्तानमध्ये अटक केलेल्या कुलभूषण सुधीर जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी कोर्टाने काल फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटत असून ठिकठिकाणी शिक्षेविरोधात निदर्शने सुरू आहेत.