नवी दिल्ली। पाकिस्तानच्या कैदेत असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव सुरक्षित आहेत, अशी कबुली पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी दिली आहे. त्यांनी भारत-पाकिस्तानसंबंधीत अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. त्यावेळी ही कबुली दिली आहे. सुरक्षेसंबंधित मुद्द्यांवर राजनैतिक मदत केवळ ‘मेरिट’च्या आधारावरच दिली जाईल, असे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील जो सामंजस्य करार आहे, त्यामध्ये म्हटलेले आहे, असे उत्तर बासित यांनी आंतरराष्ट्रीय कोर्टात झालेल्या सुनावणीवर विचारलेल्या प्रश्नाला दिले.
हाफिज सईदचा बचाव
काश्मीर ही एक समस्या असून ती सोडवणे अत्यंत गरजेचे आहे. काश्मीरप्रश्न सुटला नाही, तर उभयदेशांचे संबंधही सुधारणार नाहीत. पाकिस्तान काश्मिरींना भारताविरुद्ध भडकावत नाही, असा दावाही बासित यांनी केला. शिवाय पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी बुरहान वाणीला हिरो म्हणून काहीही चूक केलेली नाही, असेही बासित म्हणाले. कुख्यात दहशतवादी आणि मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचाही पाकिस्तानच्या उच्चायुक्तांनी बचाव केला.
जवानांच्या मृतदेहाची विटंबना नाही
भारतीय लष्कराने 9 मे रोजी नौशेरामध्ये केलेल्या कारवाईचा व्हिडिओ खोटा असल्याचा दावाही पाकिस्तानच्या उच्चायुक्तांनी केला. पाकिस्तानच्या चौक्या उध्वस्त करण्यात आलेल्या नाहीत, असा दावा बासित यांनी केला. पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमने भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना केली नाही, असा दावा बासित यांनी केला. भारताकडे यासंबंधित काही पुरावा असेल, तर तो पाकिस्तानला द्यावा, असं आव्हानही बासित यांनी दिले.
पाकिस्तान एकटा पडला नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आंतरराष्ट्रीय धोरणाने पाकिस्तानला दहशतवादाच्या मुद्द्यावरून जगभरात एकटे पाडले आहे का, असा सवाल बासित यांना केला. मात्र, असे काहीही नाही म्हणत अमेरिका, चीन आणि रशियासोबत असलेल्या संबंधांविषयीचे दाखले बासित यांनी दिले.