नवी दिल्ली । भारताचे सुपुत्र कुलभूषण जाधव यांना पाकिस्तान लष्करी न्यायालयाने हेर ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. त्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला या निर्णयावर धारेवर धरले. यामुळे तुर्तास तरी कुलभूषण जाधव आणि भारताला दिलासा मिळाला, असे म्हटले जात होते. पण, पाकिस्तानचे सुरक्षा सल्लागार सरताज अझीज यांच्या टीप्पणीमुळे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. त्यामुळे एकतर कुलभूषण जाधव यांच्यावर पाकने फाशीची कारवाई केली असावी किंवा हजर करण्याच्या स्थितीत जाधव राहिले नसावेत, असा संशय भारताच्या संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. कुलभूषण जाधव प्रकरणी आयसीजीने कानउघडणी केल्यानंतर पाक सरकार सैरभैर झाले आहे. ते सर्वजण एकमेकांविरोधात टीप्पणी करीत आहेत. त्यातच पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे सुरक्षा सल्लागार सरजात अझीज यांनी आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या निर्णयावर सूचक असे वक्तव्य केले आहे. दरम्यान, कुलभूषण जाधव जिवंत असल्याचं स्पष्टीकरण पाकिस्तानने दिलं आहे. पण त्यांना वकील देण्यास पुन्हा नकार दिला आहे.
काय केलंय वक्तव्य?
आंतरराष्ट्रीय कोर्ट कुलभूषण जाधव यांना निर्दोष ठरवू शकत नाही. जाधव यांच्या शिक्षेचा निर्णय हा कायद्यानुसार झाला आहे, असं वक्तव्य अझीज यांनी केलं होतं. ‘हे वक्तव्य अतिशय दुर्दैवी असल्याचे मत सर्वस्तरातून व्यक्त होत आहे.
त्यामुळे असेही होऊ शकते
एक म्हणजे कुलभूषण जाधव यांना मारले गेलंय आणि दुसरी शंका ही की त्यांची प्रकृती इतकी नाजूक केली गेली आहे की, त्यांना कुठे हजर करण्यायोग्यही ठेवले नसावे’, असे संरक्षण तज्ज्ञ पी. के. सेहगल यांनी सांगितलं. आयसीजीच्या निर्णयाचा अवमान केला तर पाकला भविष्यात अनेक वादांना सामोरे जावे लागेल. ‘पण पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय कोर्टाचा निर्णय न मानल्यास पाकला आंतरराष्ट्रीय पातळीवर आणखी मोठे धक्के बसतील’, असेही सांगण्यात येत आहे.
पाकच्या मदतीला चीन?
भारताचा पारंपरिक शत्रू असलेल्या पाकिस्तानसोबत चीनचे संबंध चांगले आहेत. त्यामुळे कुलभूषण जाधव प्रकरणी पाकला चीनची मदत होणार असल्याचे म्हटले जात आहे. ‘कुलभूषण जाधव प्रकरण संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत नेण्याचा पाकचा प्रयत्न दिसतोय. असे झाल्यास चीन आपल्या बाजूने व्हीटो वापरेल, अशी पाकला अशा आहे’, असे आणखी एक संरक्षण तज्ज्ञ राज कादयान यांनी म्हटले आहे.