इस्लामाबाद । पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभुषण जाधव यांच्या आईला पाकचा व्हिसा मिळण्याची शक्यता आहे. आम्ही कुलभूषण जाधव यांच्या आईच्या व्हिसा अर्जावर विचारविनिमय करत आहोत असे पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
सरताज अझीझ यांची शिफारस
जाधव यांना गेल्या वर्षी बलुचिस्तानमधून अटक करण्यात आल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला होता. जाधव यांना पाकिस्तानमधील लष्करी न्यायालयाने एकतर्फी फाशी सुनावली होती. मात्र आंतरराष्ट्रीय न्यायालयाने यावर स्थगिती आणली होती. यामुळे त्यांच्या आईने पाककडे व्हिसा मागितला होता. या पार्श्वभूमिवर आज पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या नफीस झकेरिया यांनी जाधव यांच्या आईला व्हिसा देण्याच्या भारताच्या विनंतीवर विचारविनिमय सुरु असल्याचे सांगितले. व्हिसासाठी पाकिस्तानचे परराष्ट्रविषयक सल्लागार सरताज अझीझ यांची शिफारस महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दोन दिवसांपूर्वीच आपण या संदर्भात पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार सरताज अझीझ यांना पत्र पाठवले होते. पण या पत्राला उत्तर देण्याचे सौजन्यही अझीझ यांनी दाखवले नाही असा आरोप केला होता.