हेग : कुलभूषण जाधव हे ‘रॉ’चे एजंट तसेच हेर आहेत की नाहीत हे अद्याप सिद्ध झालेले नाही, अंतिम निकाल येईपर्यंत पाकिस्तानने जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करू नये, असा महत्त्वपूर्ण निकाल गुरूवारी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिला. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास पाकिस्तानवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आंतरराष्ट्रीय न्यायालयाने देत कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानला मोठा दणका दिला आहे. पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने हेरगिरीच्या आरोपावरून कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. या फाशीच्या शिक्षेविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती.
स्पष्टीकरण द्यावे लागणार
जाधव यांना दया याचिका दाखल करण्याचा हक्क आहे. सिव्हिलाईज्ड सोसायटीत प्रत्येक देशाला आधीच निकाल जाहीर करून शिक्षा देण्याचा अधिकार नाही. कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर पाकिस्तानने कोणती पावले उचलली, याचे स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे, असे न्यायालयाने सांगितले. या खटल्याची मेरिटच्या तत्त्वावर सुनावणी केली जाणार आहे. यात दोन्ही देशांतील सरकारांना पुढील उत्तर न्यायालय देणार आहे.
न्यायालयाची चपराक
न्यायाधीश रॉनी अब्राहम यांनी पाकिस्तानचा युक्तीवाद खोडून काढत पाकला चांगलेच खडसावले. कुलभूषण जाधव हे भारतीय नागरिक असल्याचे दोन्ही देशांना मान्य आहे. मात्र ते हेर असल्याचे ठोस पुरावे नाहीत. पाकिस्तानच्या पुराव्यांवरुन कुलभूषण जाधव हे हेर किंवा स्पाय ठरत नाहीत. तसेच हा खटला आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या कार्यकक्षेत येत नाही, हे पाकचे म्हणणे चुकीचे असून थेट फाशी देता येईल हे पाकिस्तान ठरवू शकत नाही. भारतीय राजदूतांना कुलभूषण जाधव यांना का भेटू दिले नाही? कोणत्याही परिस्थितीत परदेशी नागरिकाला राजनैतिक मदत मिळायलाच हवी. कुलभूषण जाधव यांच्या अटकेची परिस्थिती ही संदिग्ध आणि वादग्रस्त आहे, असे न्यायाधीश अब्राहम म्हणाले.
पाकसाठी मोठा धक्का
या प्रकरणी 15 मे रोजी झालेल्या सुनावणीमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या वकिलांनी युक्तीवाद मांडले. पाकिस्तानने भारताला काउन्सलर अॅक्सेस नकारून व्हिएना कराराचे उल्लंघन केले असा आरोप भारताने लावला. तर, पाकिस्तानने हा मुद्दा राष्ट्रीय सुरक्षेचा असल्याने आयसीजेला हस्तक्षेप करता येणार नाही, असा युक्तीवाद केला होता. जाधव हे हेर असून, आम्ही विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे भारत देऊ शकला नाही, असे पाकिस्तानने म्हटले होते. सुनावणीदरम्यान जाधव यांची चित्रफित प्रदर्शित करण्याची परवानगी पाकिस्तानने मागितली होती. आपण भारतासाठी हेरगिरी करत होतो, अशी कबुली जाधव यांनी दिल्याचे त्या चित्रफितीत दिसत होते. ही चित्रफित प्रदर्शित करण्यास न्यायालयाने पाकला परवानगी नाकारली होती. पाकसाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात होते. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर न्यायालयाने लवकरच निकाल देऊ, असे सांगितले होते. त्यानंतर गुरूवारी दिलेल्या निकालात न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीस स्थगिती दिली आहे.
हरीश साळवे यांचे यश
भारताने दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी न्यायालयात सुनावणी झाली होती. जाधव यांना गेल्या वर्षी 3 मार्चला अटक करून हेरगिरी व विध्वंसक कारवायांच्या खोट्या प्रकरणात गोवण्यात आले. तसेच त्यांच्याकडून जबरदस्तीने जबाब घेण्यात आला, असा दावा भारताने न्यायालयात केला होता. वकील हरीश साळवे यांनी भारताची बाजू मांडली होती. भारताने जाधव यांच्याशी दूतावासामार्फत संपर्क साधण्याची विनंती सोळा वेळा केली होती. ती पाकिस्तानने फेटाळली होती. अखेर अॅड. हरीश साळवे यांच्या युक्तीवादाला यश आल्याचे दिसून येत आहे.