कुलभूषण जाधव यांच्या भेटीची परवानगी द्या

0

नवी दिल्ली : पाकिस्तानात अटकेत असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांची चौकशी करण्यासाठी आता इराणने पाककडे त्यांच्या भेटीची परवानगी मागितली आहे. दरम्यान, कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर इराणने केलेल्या या मागणीला महत्व प्राप्त झाले आहे. इराणमधून पाकमध्ये घूसखोरी करण्याचा जाधव यांनी प्रयत्न केल्याचा पाकचा आरोप आहे.

भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव हे रॉचे एजंट असल्याचा पाकने दावा केला होता. तसेच पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने 10 एप्रिल रोजी जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. पाकिस्तानने जाधव यांच्याबाबत केलेल्या सर्व आरोपांचा भारताने यापुर्वीच इन्कार केला आहे. दरम्यान, इराणने केलेल्या मागणीवर पाकिस्तानने अद्याप कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे इराणला जाधव यांची भेट घेण्याची परवानगी पाकिस्तान देणार का, हा प्रश्‍न अजूनही अनुत्तरितच आहे.