मुंबई – पाकिस्तानच्या कैदेत असलेले कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी सरकारने तत्काळ प्रयत्न करावेत म्हणून प्रदेश काँग्रेसतर्फे राज्यभर सह्यांची मोहीम राबवली जाणार आहे, अशी माहिती पक्षाचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत दिली.
कुलभूषण जाधव यांच्यावर गुप्तहेर असल्याच्या आरोपावरून पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाचा हा निकाल मानवी हक्क आणि न्यायाच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्राच्या सुपुत्राला वाचवण्यासाठी सरकारने अधिक आक्रमक होऊन आंतरराष्ट्रीय दबाव आणावा. जनमानसाची व काँग्रेसची भावना सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी ही सह्यांची मोहीम राबवली जाणार असून सह्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
डाळ दर नियंत्रक कायद्याचे काय झाले?
राज्यातील डाळीच्या व्यवस्थापनात राज्य सरकार संपूर्णपणे अपयशी ठरले आहे. शेतकऱ्यांना डाळीचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रोत्साहन देण्याची घोषणा करणाऱ्या सरकारने तुरीचे उत्पादन वाढल्यावर हमीभावाने तूर खरेदी करणे अपेक्षित होते. पण आता पणनमंत्र्यांनी अगोदर खरेदी केलेल्या तुरीची मोजणी होत नाही तोपर्यंत नवीन खरेदी करू नये, असे तुघलकी फर्मान काढल्याने संथगतीने सुरू असलेली तूर खरेदी पूर्णपणे ठप्प झाली आहे. ग्राहकांकरिता काहीतरी करत आहोत हे दाखविण्याकरिता डाळ दर नियंत्रक कायदा आणू अशी घोषणा सरकारने सभागृहात केली. या अनुषंगाने सरकारने राष्ट्रपतींच्या मंजुरीकरिता केंद्र सरकारला या कायद्याचे प्रारूप पाठविल्यावर त्यावर केंद्र सरकारतर्फे विरोध केला गेला आहे. गेल्या दीड वर्षात सरकारने तातडीची उपाययोजना म्हणून जाहीर केलेल्या घोषणेचे आजवर काय केले गेले, असा सवालही त्यांनी केला.
तो राणे यांचा व्यक्तिगत कार्यक्रम
नारायण राणे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना आमच्या नेहमीच शुभेच्छा असतात. वैयक्तिक कार्यक्रमासाठी त्यांनी कुणाला बोलवावे हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे, असेही ते म्हणाले. राणे यांनी नुकत्याच साजरा केलेल्या ६५ व्या वाढदिवसाच्या सोहळ्याला भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना निमंत्रण नव्हते का, असा सवाल केल्यानंतर सावंत बोलत होते. आमचे नेते सुशिलकुमार शिंदे त्या कार्यक्रमाला होतेच, असेही ते म्हणाले.