कुलभूषण जाधव यांना तात्काळ फाशी द्या!

0

इस्लामाबाद । भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना तात्काळ फाशी द्यावी, अशी मागणी करणारी याचिका पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. याप्रकरणात याचिकाकर्त्यांनी पाकिस्तान सरकार, गृह आणि संरक्षण खात्याचे सचिव यांनादेखील प्रतिवादी केले आहे. व्यवसायाने वकील असलेल्या मुझामिल अली यांनी ही याचिका दाखल केली आहे. वकील फारुख नईक यांच्यामार्फत त्यांनी ही याचिका दाखल केली आहे. जाधव यांच्या प्रकरणातील सुनावणी ही पाकिस्तानमधील कायद्यानुसाारच झाल्याचे स्पष्ट करावे, असे त्यांनी याचिकेत म्हटले आहे. पाकिस्तानी जनतेला त्यांच्या देशाविरोधात कट रचणार्‍या व्यक्तिला शिक्षा देण्याचा अधिकार आहे, असे या याचिकाकर्त्याचे म्हणणे होते. शिक्षेत बदल करता येत नसेल तर त्यांना तात्काळ शिक्षा द्यावी, असेही या याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

पाकिस्तान सरकार काय भूमिका मांडणार ?
गेल्यावर्षी पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना अटक केली होती. हेरगिरी व घातपाती कारवायांच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. भारताने याविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिल्याने पाकिस्तान तोंडघशी पडले होते. या निकालानंतर पाकिस्तानने पुन्हा आंतरराष्ट्रीय न्यायालयात अर्ज दिला होता. जाधव प्रकरणाची तातडीने सुनावणी घ्यावी अशी विनंती पाकिस्तानने केली होती. यापाठोपाठ आता सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल झाली असून, यावर पाक सरकारकडून काय भूमिका मांडली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जाधव यांनी इराणमधून बलुचिस्तान प्रांतात प्रवेश केल्यानंतर सुरक्षा दलांनी गेल्या वर्षी 3 मेरोजी अटक केली, असा पाकिस्तानचा दावा आहे. मात्र, जाधव हे व्यापारानिमित्त इराणला गेले असताना त्यांचे तेथूनच अपहरण करण्यात आले, या म्हणण्यावर भारत ठाम आहे.