नवी दिल्ली : कुलभूषण जाधव हे भारताचे सुपूत्र असून त्यांना फाशी दिल्यास पाकिस्तानने परिणाम भोगण्यासाठी तयार राहावे, असा थेट इशाराच परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिला आहे. कुलभूषण हे निर्दोष असून त्यांच्या सुटकेसाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
कुलभूषण जाधवप्रकरणावर मंगळवारी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी राज्यसभा आणि लोकसभेत निवेदन दिले. सुषमा स्वराज म्हणाल्या, कुलभूषण जाधव यांनी कोणतेही गैरकृत्य केल्याचे आढळलेले नाही. त्यांच्याविरोधात कोणताही ठोस पुरावा नाही. त्यांना फाशीची शिक्षा देणे म्हणजे पूर्वनियोजित हत्याच ठरेल असे स्वराज यांनी सुनावले. कुलभूषण जाधव यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्याच्या दिशेने पाकिस्तानने पाऊल टाकले तर पाकिस्तानने परिणामांना सामोरे जाण्यासाठी तयार राहावे. दोन्ही देशांमधील संबंधावर याचे परिणाम होतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. भारताच्या या सुपूत्राला वाचवण्यासाठी वकील उभा करणे ही छोटी गोष्ट आहे. आम्ही थेट राष्ट्रपतींपर्यंत हा मुद्दा उपस्थित करू, असे त्या म्हणाल्यात. कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेवर पाकिस्तानमधील एका नेत्यानेच प्रश्न उपस्थित केल्याचे सुषमा स्वराज यांनी निदर्शनास आणून दिले. कुलभूषण जाधव यांच्याविरोधात कट रचण्यात आला, असा आरोपही त्यांनी केला.
भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना सोमवारी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. मंगळवारी संसदेतही कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेच्या मुद्द्यावर चर्चा झाली. लोकसभेत काँग्रेस खासदार मल्लिकार्जून खरगे यांनी जाधवप्रकरणावरुन केंद्र सरकारला जाब विचारला. पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या मुलीच्या लग्नात हजेरी लावतात. मग ते अशा प्रकरणात थेट पाकिस्तानच्या पंतप्रधानांशी चर्चा करू शकत नाही का? असा प्रश्न त्यांनी मोदी सरकारला विचारला.