नवी दिल्ली – भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानमध्ये सुनावण्यात आलेल्या फाशी प्रकरणी हस्तक्षेप न करण्याचे संकेत संयुक्त राष्ट्र (यूएन) संघाने दिले आहेत. आयएएनएस या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, यूएनचे सरचिटणीस अंतोनियो गुटरेस यांचे प्रवक्ते स्टिफन ड्यूजरिक यांनी पत्रकारांबरेाबर बोलताना हे संकेत दिले आहेत.
ुकुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर पाकिस्तान व भारत यांच्यातील वाढत्या तणावावर त्यांना प्रश्न विचारल्यावर ड्यूजरिक म्हणाले की, आम्ही कायदेशीर वैधतेवर निर्णय देण्याच्या स्थितीत नाही. याबाबत आम्ही काहीही सांगू शकत नाही, असे सांगत जोपर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधाचा विषय येतो. तेव्हा आम्ही वारंवार दोन्ही देशांनी शांततापूर्ण चर्चेने हा प्रश्न निकाली लावण्यासाठी प्रयत्न करतो, असेही ते म्हणाले.
पाकिस्तानने भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना भारतीय गुप्तचर संस्था असलेल्या रॉचे गुप्तहेर असल्याचा आरोप करत त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. भारताने जाधव यांच्यावरील सर्व आरोपांचा इन्कार केला असून जाधव यांना जर फाशी दिली तर ही विचारपूर्वक केलेली हत्या समजेल, असे म्हटले आहे. भारताने जाधव यांच्याविरोधातील खटल्याच्या विश्वसनीयतेवरच प्रश्न निर्माण केले आहेत.
जाधव यांना आपला बचाव करण्यासाठी कायदेशीर मदतही देण्यात आली नव्हती. त्यांना वकील ठेवण्याचा मूलभूत अधिकारही देण्यात आला नव्हता. त्यांच्यावर सुरू असलेल्या खटल्याबाबत गोपनीयता पाळण्यात आली होती. भारताचे सर्व आरोप पाकिस्तानने नाकारले आहेत. भारतातील पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांना याप्रकरणी समन्सही बजावले होते. या वेळी बासित यांनी पाककडे जाधव यांच्याविरोधात ठोस पुरावे असल्याचे म्हटले होते.