कुलभूषण प्रकरण भारताची कणखर भूमिका

0

नवी दिल्ली – नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावल्यानंतर तसेच पाकची या प्रकरणी आडमुठेपणाची भूमिका कायम असल्याचे निदर्शनास आल्यावर केंद्र सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेण्याची तयारी केली आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून पाकिस्तानी गायक, अभिनेत्यांना भारताचा व्हिसा देताना संथगती आत्मसात करा, असे आदेश इस्लामाबादमधील भारतीय दुतावासाला देण्यात आले आहेत.

कुलभूषण जाधवप्रकरणी पाकिस्तानवर दबाव टाकण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरु आहेत. सुरुवातीला भारताने सरसकट सर्व पाकिस्तानी नागरिकांनी भारताचा व्हिसा देणे बंद करण्याचा विचार केला होता. पण पहिल्या टप्प्यात पाकिस्तानी कलाकार, गायक यांच्या व्हिसावर निर्बंध आणायचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पाकिस्तानी कलाकार मंडळींना भारताचा व्हिसा मिळवणे कठीण होणार असे दिसते. अशा प्रकारे केंद्र सरकार पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी पर्यायी मार्गांचा विचार करत आहे.

दरम्यान कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेबाबत कुठलीही तडजोड करणार नाही, असे इंटर सर्व्हीसेस पब्लिक रिलेशन्स या पाकिस्तानच्या मीडिया विंगने पत्रकार परिषदेतून स्पष्ट केले आहे. मात्र त्याच वेळी नेपाळमधून पाकच्या लष्कराचा एक निवृत्त अधिकारी बेपत्ता असल्याची कबुलीही पाकिस्तानच्या परराष्ट्र विभागाने दिली आहे.

कुलभूषण यांचे वकील न घेण्याचा पाकच्या वकील संघटनेचा फतवा
कुलभूषण जाधव यांचे वकीलपत्र घेतल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी धमकी पाकिस्तानमधील वकील संघटनेकडून देण्यात आली आहे. त्यामुळे कुलभूषण जाधव यांना शिक्षा सुनावताना कायदेशीर प्रक्रियेचे पालन झाल्याचा दावा करणार्‍या पाकिस्तानचा दुटप्पीपणा उघड झाला आहे.

कुलभूषण जाधव यांना मृत्युदंडाची शिक्षा दिल्यानंतर भारताने पाकिस्तानला चांगलेच ठणकावले होते. या दबावामुळे पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना स्वत:च्या बचावासाठी 60 दिवसांची मुदत द्यायचे मान्य केले होते. मात्र, आता लाहोर उच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनने काढलेल्या फतव्यामुळे पाकिस्तान करत असलेली न्यायाची भाषा केवळ देखावा असल्याचे सिद्ध झाले आहे.

पाकचा निवृत्त कर्नल गायब
भारत-नेपाळ सीमेजवळ लुंबिनी येथे कर्नल (निवृत्त) मोहम्मद झहिर हबीब यांना पकडण्यात आले आहे. कुठलेली कारण न देता त्यांना ताब्यात घेतले गेले आहे. हबीब हे सध्या भारताच्या ताब्यात असल्याचे सांगण्यात येत आहे, असा आरोप पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नफिस झकारीया यांनी केला. झहिर हबीब आणि कुलभूषण जाधव यांची तुलना होऊ शकत नाही, ही प्रकरणे वेगवगेळी आहेत. भारताने ती जोडण्याचा प्रयत्न करू नये. झहिर यांचे बेपत्ता होणे हा योगायोग नाही. यामागे नक्कीच कुठल्यातरी परकीय गुप्तचर यंत्रणेचा हात आहे. म्हणूनच आम्ही नेपाळ सरकारच्या माध्यमातून झहिर यांचा शोध घेत आहोत. नेपाळ सरकारही आम्हाला मदत करत आहे, असेही ते म्हणाले.