कुलूप तोडण्याच्या यशाच्या आनंदात चोरीच्या प्रेरणेची ‘त्या’ दोघांची कबुली!

0

जळगाव। मोबाईलवरील युट्युबवर वेगवेगळे दृष्य बघत असताना कटरने कुलुप तोडताना व सीसीटीव्ही कॅमेराला चिकटपट्टी चिकटवून चोरी करताचे दृष्य दिसल्याने दोन महाविद्यालीन तरुणांनी तीच पध्दत अवलंबवून शहरात दोन ठिकाणी चोरी केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला होता. दरम्यान, पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता फक्त युट्यूबवर विडीओ पाहिल्यानंतर कुलूप तोडण्याच्या यशाच्या आनंदात चोरीची प्रेरणा मिळाल्यामुळे त्या चोर्‍या झाल्यात अशी कबूली दोघांनी दिली आहे. दुपारी त्यांना बालन्यायमंडळात हजर करण्यात आल्यानंतर जामीनावर सुटका करण्यात आली आहे.

या ठिकाणी केल्या चोर्‍या
25 जून रोजी मू.जे.महाविद्यालयाच्या पाठीमागे असलेल्या लक्ष्मी नगरात प्रवीण रमेश वारडे यांच्या साई श्री मोबाईल नावाच्या दुकानाचे कुलुप कटरने तोडून चोरट्यांनी त्यातील 5 मोबाईल,आईस्क्रीम, सॅँडविच, चॉकलेट, कॅडबरी व रोख रक्कम असा 34 हजाराचा ऐवज लांबविला होता. तर त्याच रात्री रिंगरोडवरील हॉटेल चाट लाऊंज बाहेरील फ्रीजचे कुलूप तोडून सहा हजाराची शितपेय लांबविली होती. सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद होऊ नये म्हणून त्यांनी दोन कॅमेजर्‍यांना चिकटपट्टी लावली होती. यानंतर बुधवारी रामानंदनगर पोलिसांनी दोन्हील अल्पवयीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी चोरीची कबूली दिल्यानंतर पाच मोबाईल व कटर पोलिसांना काढून दिले होते.

कुलूप तोडून दाखविले
आठ दिवसाच्या मेहनतीनंतर हे दोन्ही विद्यार्थी रामानंदनगर पोलिसांच्या हाती लागले. यानंतर अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह व उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी या दोन्ही विद्यार्थ्यांची चौकशी केली आणि त्यांना घटनास्थळी घेवून जावून दोघांना कुलूप कसे तोडले असे विचारले असता त्यांनी प्रात्यक्षिक करून दाखविले. यातच निव्वळ मौजमस्तीसाठी चोर्‍या केल्याचेही हेच कारण स्पष्ट झाले. तर दोन्ही विद्यार्थ्याची चांगल्या कुटूंबातील व चांगले गुण मिळविणार असल्याचे पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले.

ऑनलाईन मागविले कटर
दुकानांचे कुलूप जर तोडायचे असेल तर कटर हवे, मात्र कटर कोठून आणावे? असा प्रश्‍न पडल्यानंतर दोघांनी ऑनलाईन कटरची बुकींग केली. त्यानंतर दोन ते तीन दिवस कटर घरीच ठेवले. घरच्यांनी कटरची विचारपूस केल्यानंतर मित्राचे वडील कन्स्ट्रक्शन काम करतात आणि त्यांचा घरचा पत्ता नसल्यामुळे तो आपल्या पत्त्यावर मागविल्याचे सांगितले. कुलूप तोडण्यात यश आल्याने त्यांना प्रेरणा मिळत गेली आणि दोघांनी रिंगरोडवरील चॅट कॅफे देखील फोडले. मात्र, बुधवारी रामानंदनगर पोलिसांना चोरटे निषन्न झाल्यानंतर दोघांना ताब्यात घेतले .