कडजी दरोड्याची उकल; अनेक गुन्हे उघडकीस येणार
जळगाव– कुर्हाडीच्या धाकावर पारोळ्याजवळील कडजी-शेवगाव दरम्यान वाहन चालक आबा मराठे यांच्याकडील रोख रकमेसह महिलांच्या अंगावरील दागिने लूटणार्या टोळीतील दोघा कुविख्यात दरोडेखोरांना अटक करण्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेसह पारोळा पोलिसांना शुक्रवारी यश आले आहे. आरोपींच्या अटकेनंतर अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. राजू उर्फ इट्या बाजर्या पावरा व दयाराम उर्फ मकराम बाजर्या बारेला (चिलारीया, खरगोण, मध्यप्रदेश) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
संयुक्त कारवाईत यश
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेसह पारोळा पोलिसांनी राबवलेल्या संयुक्त मोहिमेत आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश आले. विशेष म्हणजे अटकेतील दोन्ही आरोपी कुविख्यात दरोडेखोर बाजर्या बारेलाची मुले आहेत. दयाराम बारेलाविरुद्ध यापूर्वी चोपडा शहर, रावेर, यावल येथे दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपअधीक्षक सदाशीव वाघमारे, जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.