कुष्ठरोग शोध मोहिमेसाठी जिल्ह्यात 2814 पथके सज्ज

0

जळगाव । राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यात 5 ते 20 सप्टेंबर 2017 या कालावधीत कुष्ठरोग शोध मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत घरोघरी जाऊन नागरीकांची तपासणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे 2 हजार 814 पथके तयार करण्यात आल्याची माहिती सहायक संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग) यांनी दिली आहे. कुष्ठरोग शोध मोहिम ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रगती योजनेतंर्गत येत आहे. या मोहिमेचे उद्दिष्ट समाजात लपुन राहिलेले कुष्ठरुग्ण शोधुन त्यांना विनाविकृती बरे करणे असे आहे. समाजातील संसर्गाची साखळी खंडीत करुन कुष्ठरोग निर्मुलनाच्या दिशेने प्रयत्न करणे असे आहे.

7 लाख 11 हजार व्यक्तींची होणार तपासणी
या मोहिमेत एक पुरुष व एक स्त्री असे एक पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक घरोघरी जावून घरातील संपुर्ण व्यक्तींची शारीरीक तपासणी करणार आहे. या तपासणीत कोणाही व्यक्तीच्या अंगावर कुष्ठरोगाची संशयित लक्षणे आढळल्यास त्यांचे संशयीत म्हणून नाव नोंदविण्यात येणार आहे. व त्यांचे निदान वैद्यकीय अधिकार्‍यांमार्फत करण्यात येणार असून निदान झाल्यास त्वरीत उपचार सुरु करण्यात येणार आहे. या शोध मोहिमेत जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामीण भागातील लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तसेच शहरी भागातील निवडक (स्लम व जोखीम) असलेला भागातील एकुण 7 लाख 11 हजार 482 घरांतील व्यक्तींचे सर्वेक्षण व तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यात 2 हजार 814 पथकांमार्फत घरोघरी सर्वेक्षण व तपासणी करणात येणार आहे. त्यामुळे पथकास मदत करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले असून लवकरच तपासणीस सुरूवात होणार आहे.

तपासणी करण्याचे आवाहन
नागरीकांनी आपल्याकडे येणा-या तपासणी पथकास सहकार्य करुन आपल्या घरातील सर्व सदस्यांची तपासणी करुन घ्यावी व पथकास सहकार्य करावे. असे आवाहन सहाय्यक संचालक आरोग्यसेवा (कुष्ठरोग) जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे. पथकाकडून घरोघरी जावून शारीरिक तपासणी करण्यात येणार आहे.त्यामुळे नागरिकांनी पथकास मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे. कुष्ठरोगाची लक्षणे आढळल्यास त्यांचे संशयीत म्हणून नाव नोंदविण्यात येणार आहे. व त्यांचे निदान वैद्यकीय अधिकार्‍यांमार्फत करण्यात येणार असून निदान झाल्यास त्वरीत उपचार सुरु करण्यात येणार आहे.