जळगाव- तालुक्यातील कुसुंबा येथील दाम्पत्याच्या खूनप्रकरणातील तिघं आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या गुन्ह्यात आरोपींनी गळफास देण्यासाठी वापरेलील दोरी, जंगलात फेकलेले मोबाइल, आरोपींनी वाटणी केलेले दागिने व रोख रक्कम, व्याजाच्या व्यवहाराचा शोध पोलीस घेत आहेत.
कसुंबा येथील मुरलीधर राजाराम पाटील व त्यांच्या पत्नी आशाबाई मुरलीधर पाटील यांचा खून व्याजाच्या व्यवहारातील वादातून 21 रोजी रात्री झालेला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुधाकर रामलाल पाटील (वय 40, चिंचखेडा, ता.जामनेर), देविदास नामदेव श्रीनाथ (वय 40) व अरुणाबाई गजाजन वारंगणे (वय 30, रा.कुसुंबा) यांना अटक केली आहे. अरुणाबाई हिने आशाबाई पाटील यांच्याकडून 10 ते 11 लाख रुपये व्याजाने घेतले होते. कर्ज वसुलीसाठी तगादा सुरू होता. तर सुधाकर व देविदास देखील कर्जबाजारी होते. या तिघांनी पाटील दाम्पत्याला गळफास देवून त्यांचा खून केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या वस्तू जप्त करायच्या आहेत. त्यामुळे आरोपींना नऊ दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी पोलिसांनी केली होती. याप्रकरणी न्या.साठे यांनी आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सरकार पक्षातर्फे अॅड.गिरीश बारगजे यांनी काम पाहिले.
Prev Post
Next Post