कुसुंब्यातील दाम्पत्य खूनप्रकरणी चौघांना अटक

जळगाव- तालुक्यातील कुसुंबा येथील ओम साईनगरामधील मुरलीधर राजाराम पाटील व त्यांच्या पत्नी आशाबाई मुरलीधर पाटील या दाम्पत्याच्या खून प्रकरणी सोमवारी पहाटे 4 वाजता पोलिसांनी चार जणांना अटक केली. हा खून व्याजाचा व्यवहार व जुन्या वादातून झाल्याचे स्पष्ट होत आहे.
कुसुंब्यातील दाम्पत्याचा खून व्याजाच्या व्यवहारातून झाल्याची माहिती समोर आली आहे. यात सुधाकर रामलाल पाटील (वय 40, रा.चिंचखेडा, ता.जामनेर), देविदास नामदेव पाटील (वय 40), अरुणाबाई गजानन वारंगे (वय 30) व चंद्रकला सुभाष धनगर (कुसुंबा) यांना पोलिसांनी अटक केली. सुधाकर पाटील यास चिंचखेडा येथून, तर अरुणाबाई वारंगे व देविदास पाटील यांना कुसुंब्यातून ताब्यात घेतले. अरुणाबाई वारंगे हिने आशाबाई पाटील हिच्याकडून 12 लाख रुपये व्याजाने घेतले होते. या व्यवहारातून वाद उफाळला. पाटील दाम्पत्याचा खून बुधवारी झाला होता. तर ही घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली होती. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. हा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस आणला.