कुस्तीपटूंसाठी राष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण केंद्र उभारणार

0

धुळे । जिल्ह्यातील कुस्तीपटूंची संख्या लक्षणीय आहे आणि या कुस्तीपटूंना शास्त्रोक्त पध्दतीने प्रशिक्षण मिळावे यासाठी राष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार असे प्रतिपादन ग्रामविकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले. शहरातील गरुड कॉम्प्लेक्स येथील नवनिर्मित क्रीडांगणाच्या लोकार्पण सोहळ्यात पालकमंत्री भुसे बोलत होते. या क्रिडांगणात बसविण्यात आलेल्या एल.ई.डी. दिव्यांचा स्वीच सुरु करून त्याचेही लोकार्पण यावेळी करण्यात आले. यावेळी माजी आमदार प्रा.शरद पाटील, हिलाल माळी, पंकज गोरे, अतुल सोनवणे, भूपेंद्र लहामगे, महेश मिस्तरी, संजय गुजराथी, जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस, महेंद्र राजपूत, महेंद्र गावडे, परेश उपकारे, मुझफ्फर शेख, मनीषा पवार, सुजाता गुल्हाने यांच्यासह विविध खेळांचे प्रशिक्षक, क्रीडापटू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आरोग्यास लाभ मिळेल
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले गरुड कॉम्प्लेक्स येथील नवनिर्मित क्रिडांगण सर्व सोयीसुविधांनी सज्ज झाल्यामुळे क्रीडापटूंसह नागरिकांना याचा लाभ होईल. या मैदानात असलेल्या कबड्डी, खो-खो, व्हॉलिबॉल, बॅडमिंटन या खेळांसह नागरिकांसाठी तयार करण्यात आलेल्या जॉगिंग ट्रॅक मुळे शहरातील नागरिकांना आरोग्यदायी वातावरणात मैदानी खेळांचा लाभ मिळणार आहे. पालकांनी देखील आपल्या मुलांना मोबाईल, संगणकीय खेळांपेक्षा मैदानी खेळांसाठी प्रवृत्त करण्याचे आवाहनही त्यांनी केले. प्रथम जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस यांनी प्रास्ताविकातून लोकार्पण करण्यात आलेल्या गरूड कॉम्प्लेक्स क्रीडांगणाची माहिती दिली, जिल्ह्यात होणार्‍या विविध क्रीडा स्पर्धा, प्रशिक्षण शिबिरांचे आयोजनासाठी या क्रीडांगणाचा उपयोग होणार आहे. तर बाहेरगावाहून येणार्‍या खेळाडूंसाठी याठिकाणी निवास व्यवस्थाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.