कुस्तीपटू सुशील कुमार ‘राष्ट्रकुल’साठी पात्र!

0

नवी दिल्ली : भारताचा आघाडीचा कुस्तीपटू आणि ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता सुशील कुमार 2018मध्ये होणार्‍या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी पात्र झाला आहे. शुक्रवारी 74 किलो वजनी गटात झालेल्या सामन्यात सुशीलने कुस्तीपटू जितेंदर कुमारचा पराभव करत राष्ट्रकुल स्पर्धेचे तिकीट मिळवले. सुशील कुमारने 2010मध्ये नवी दिल्ली येथे आणि 2014मध्ये ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते. त्यामुळे सुवर्ण पदकांची हॅट्ट्रीक साधण्यासाठी सुशील कुमार उत्सुक आहे.

याआधी खांद्याच्या दुखापतीनंतर पुनरागमन करणार्‍या सुशील कुमारने दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग येथे झालेल्या राष्ट्रकुल कुस्ती चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले होते. या विजयानंतर ‘माझ्यासाठी हा गौरवाचा, तसेच भावूक क्षण आहे. मी आंतरराष्ट्रीय स्तरावर 3 वर्षांनंतर पुनरागमन केले आहे. सुवर्ण पदक जिंकून देणारा हा विजय मी माझे माता-पिता, गुरू सतपाल, आध्यात्मिक योगगुरू स्वामी रामदेव आणि देशाच्या प्रत्येक नागरिकाला अर्पण करतो,’ असे ट्वीट सुशील कुमारने केले होते.