कृउबाची जागा विक्री प्रकरणी कारवाई करा

0

जळगाव । कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकर्‍यांसाठी कार्य करणारी शेतकर्‍यांची संस्था आहे. यावर सहकार विभागाचे पुर्ण नियंत्रण असतांना 1999 मध्ये तत्कालीन अध्यक्ष दुर्गादास दामु भोळे व नगरसेवक प्रदीप रायसोनी यांनी परस्पर बाजार समितीची कोट्यावधी रुपयांच्या जागेची परस्पर विक्री केली. जागा विक्रीचा ठराव सभेत मंजुर करुन त्यांनी प्रोसिडींग बुकात नोंद केली आहे. जागेची विक्री काढण्याअगोदर सहकार खात्याची परवानगी घेणे गरजेचे असतांना विनापरवानगी जागेची विक्री करण्यात आली आहे. संबंधीतांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी माहिती अधिकारी कार्यकर्ते उल्हास साबळे यांनी केली आहे. कॉग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. करोडो रुपयाची जागा विकुन देखील कृउबा कर्जबाजारी कसे असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला आहे. तत्कालीन संचालकांनी जागा विकून पैसे लाटल्याचा आरोप त्यांनी केला आहे. असे प्रकरण मुंबई कृउबा समितीत घडले होते. याबाबत संचालकांवर कारवाई करण्यात आली असून जळगाव येथे देखील कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर यांच्याकडे तक्रार दाखल केली होती तक्रारीची देखल घेत यांनी तालुका निबंधक यांच्याकडे संबंधीत प्रकरणाची सुनावणी ठेवली असून आज याप्रकरणी सुनावणी आहे.