संकुल बांधकामासाठी केली होती 126 वृक्षांची कत्तल
जळगाव– जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन संकूल तयार करण्यासाठी बाजार समिती परिसरातील 126 वृक्ष तोडले होते. याबाबत आलेल्या तक्रारीवरुन महापालिकेने बाजार समिती प्रशासनाला 12 लाख 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. दोन महिने उलटून देखील समितीने दंडाच्या रक्कमेचा भरणा न केल्याने मनपा प्रशासनाने े पुन्हा बाजार समितीला केलेल्या दंडावर 2 टक्के व्याज आकारणीची नोटीस बजावली आहे.
जून 2019 मध्ये जळगाव कृषी बाजार समितीच्या आवारात नविन संकुलाच्या कामासाठी संबधित मक्तेदाराने समिती आवारातील 126 वृक्ष एका रात्रीत तोडले होते. महापालिकेची कुठलीही परवानगी न घेत या वृक्षांची कत्तल करण्यात आली होती. सप्टेंबर महिन्यात मनपाच्या वृक्ष प्राधिकरणच्या झालेल्या बैठकीत या प्रकरणी चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गुगल अर्थव्दारे पाहणी करण्यात आली. त्यात बाजार समितीच्या आवारात 126 वृक्षांची कत्तल झाल्याचे निष्पन्न झाले होते. प्रत्येक वृक्षाला 10 हजार रुपये दंड प्रमाणे 12 लाख 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.
तत्काळ वसुली करण्याची मागणी
दंड आकारल्यानतंर महापालिका प्रशासनाने दोनवेळा बाजार समितीला दंडाच्या रक्कमेचा भरणा करण्याची नोटीस बजावली होती. मात्र, अद्याप बाजार समितीने ही रक्कम भरलेली नाही. याबाबत तत्काळ वसुली करण्याची मागणी शिवसेनेचे नगरसेवक व वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य प्रशांत नाईक यांनी केली आहे.दरम्यान महापालिकेने आता पुन्हा बाजार समितीला दंडाबाबत नोटीस बजावली असून त्यात थकीत दंडावर 2 टक्के व्याज आकारण्याचा ईशारा देण्यात आला आहे. बाजार समिती प्रशासन ही रक्कम भरणार नाही. तर ही रक्कम मक्तेदाराकडून वसुल करण्यात येणार असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली आहे.