शिरपूर । शहरातील जैन नुतन स्थानकात व्यापारी बांधवांची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत विशाल जैन व आतिश जैन ह्या व्यापार्यांवरील झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ नुतन जैनस्थानक येथे आयोजित केलेल्या व्यापारी सभेस शेकडों च्या संख्येने व्यापारी बांधवांनी उपस्थित राहून ह्या भ्याड हल्ल्याच्या निषेध व्यक्त केला. शिरपूर सारख्या शांत ठिकाणी वाढत चाललेल्या गुंडप्रवृत्तीबद्दल चिंता व्यक्त करत प्रशासनाने वेळीच योग्य पाऊले उचलून ह्या गुंडांचा बंदोबस्त करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
21 नोव्हेंबर रोजी ठेवणार बाजार बंद
व्यापार्यांना दमदाटी करणे , शिविगाळ करणे , खंडणी वसुल करणे अश्या घटनांनी व्यापारीवर्ग वैतागला असून त्यांच्यात असुरक्षीततेची भावना तयार झाली आहे. ह्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ मंगळवार 21 नोव्हेंबर रोजी बाजार बंद ठेवण्याचा सर्वसंमती ने निर्णय घेण्यात आला. तसेच या दिवशी सकाळी 10 वाजता मुकमोर्चांचे आयोजन शिरपूर बस स्टँड ते पोलिस स्टेशन पर्यंत काढण्याचे ठरले असून यापुढे ही व्यापारी एकता असेच कायम ठेऊ असा निर्धार व्यक्त करण्यात आले. व्यापारी असोसिएशन अध्यक्ष कैलास रतनलाल अग्रवाल, मर्चंट्स बँक संचालक नवनीत राखेचा , महावीर पतसंस्था अध्यक्ष सुवालाल ललवाणी , मर्चंट्स बँक पुर्व अध्यक्ष कैलास बंसीलाल अग्रवाल , स्वाभिमान प्रतिष्ठान अध्यक्ष विजय बाफना , नगरसेवक सोनु सोनार, शिवसेनेचे राजु टेलर , मनोज संकलेचा यांनी सभेस मार्गदर्शन केले, तर विशाल जैनने झालेली घटना सांगितली. यावेळी भाजपाचे व्यापारी आघाडीचे ग्रामीण जिल्हा सरचिटणीस गणेश जैन रात्रीच्या बैठकीत उपस्थित होते. सर्वपक्षांनी बाजार बंद व मुकमोर्चास पाठिंबा जाहीर केला आहे.