कृऊबातील व्यापार्‍यांचे निषेध आंदोलन, रॅलीतून घोषणाबाजी

0

भिंत बांधुन देण्यासाठी आंदोलन ; आजपासून आमरण उपोषण

जळगाव – येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील 15 दिवसांपूर्वी विकासकाने येथील संरक्षक भिंत आणि मुतार्‍या पाडल्या होत्या. तसेच बाजार समिती परिसरातील सुमारे सव्वाशे झाडे तोडले होते. आक्षेप घेतल्यानंतर त्यांनी 15 दिवसात दोघांचे पुन्हा बांधकाम करून देण्याचे आश्वासन दिले होते. पण प्रत्यक्षात तसे घडले नाही. होती तशी भिंत बांधून देण्यात यावी, यासाठी व्यापार्‍यांचा बेमुदत बंद सुरु आहे. यात मंगळवारी व्यापार्‍यांनी कृऊबा प्रवेशव्दारासमोर काळे झेंडे दाखवून निषेध आंदोलन केले तसेच मार्केट आवारात दुचाकी रॅलीकाढून घोषणाबाजी करुन प्रशासनाचा जोरदार निषेध व्यक्त केला. बुधवारपासून सर्व व्यापारी कृऊबा प्रवेशव्दाराजवळ मंडप टाकून आमरण उपोषणास बसणार असल्याचे विष्णु तापडीया यांनी सांगितले.

व्यापार्‍यांना कुठलीही पूर्व कल्पना न देता विकासकामार्फत कृऊबाची भिंत तसेच पाण्याची टाकी, प्रसाधनगृहे जमीनदोस्त करण्यात येवून वृक्षही नष्ट करण्यात आले होते. भिंत बांधून द्यावी, यासाठी व्यापार्‍यांनी आंदोलनाच अस्त्र उगारल्यावर सभापतींसह विकासकाने 15 दिवसात आहे तशीच भिंत बांधकाम करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र तसेच न झाल्याने व्यापार्‍यांनी पुन्हा बेमुदत बंदचा पवित्र घेतला असून आंदोलन सुरु आहे.

घोषणांनी दणाणले कृऊबा परिसर
मंगळवारी सकाळी आंदोलनात आडत असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब बेहरे, उपाध्यक्ष शशीकांत बियाणी, व्यापारी प्रतिनिधी अध्यक्ष अशोक राठी, विष्णुकांत तापडीया, नितीन बेहरे, दिनेश राठी, राजू दयाराम, रवी सुर्यवंशी, सचिन अग्रवाल, कल्लू अग्रवाल याच्यासह 100 ते 150 व्यापारी सहभागी झाले होते. यात युवा व्यापार्‍यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. व्यापारी एकता जिंदाबाद, हम सब एक है, हमारी मांगे पुरी करो, सुरक्षा भिंत बांधून द्या, शेतकर्‍यांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्या, अशी घोषणा यावेळी देण्यात आला. दुचाकी रॅलीतही या घोषणाबाजीने कृऊबा परिसर दणाणले होते.