पिंपरी-चिंचवड : नदीमध्ये सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेविना नद्यांमध्ये सोडले जाते, याविषयी महापालिका काही करत नाही आणि वर्षातून केवळ 10 दिवस असणार्या गणेशोत्सवात जलप्रदूषणाच्या नावाखाली मूर्तीविसर्जन करण्यास अटकाव करते. यंदा महापालिकेने कृत्रिम हौद उभारले असून त्यामध्ये विसर्जन करण्यास सांगितले आहे. हा निर्णय हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारा असून तो निर्णय तात्काळ रहित करावा, या मागणीसाठी गणेशभक्त आणि हिंदुत्ववादी संघटना यांनी भोसरीतील पीएमटी चौकात ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलन’ करण्यात आले. यावेळी 150 हून अधिक गणेशभक्त आणि हिंदुत्ववादी उपस्थित होते.
इतरही मागण्या
यावेळी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या हत्यांचा तपास सीबीआय’कडे सोपवावा, हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या ‘का बॉडीस्केप्स’ या मल्याळी चित्रपटावर बंदी आणावी, नागपूर ‘मेट्रो’च्या डब्यांचे चिनी आस्थापनाला दिलेले कंत्राट तात्काळ रहित करावे, ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’ यांचे ‘फेसबुक अकाऊंट’ त्वरित बंद करावे आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी भाजपचे नगरसेवक विलास मडिगेरी, ह.भ.प. माणिकराव मोकाशी, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. पन्नालाल जाधव, आसाराम बापू संप्रदायाचे प्रशांत पोफळे, हिंदू जनजागृती समितीचे नागेश जोशी, सनातन संस्थेचे चंद्रशेखर तांदळे आदी उपस्थित होते.