पुणे । वीज निर्मिती केंद्रांना कोळशाच्या उपलब्धतेत व पुरवठ्यामध्ये अडचणी येत असल्यामुळे राज्यात तात्पुरते भारनियमन करण्यात येत आहे. त्यामुळे विजेची उपलब्धता व मागणी यांचे नियोजन करण्यासाठी कृषिग्राहकांच्या वीज उपलब्धतेच्या वेळापत्रकात तात्पुरता बदल करण्यात आला आहे.
राज्यात कृषिपंपासाठी ज्या ठिकाणी स्वतंत्र वाहिन्या उभारल्या आहेत व ज्या ठिकाणी सिंगल फेजिंग योजना आहे, अशा वाहिन्यांवर सद्य परिस्थितीत दिवसा ८ तास व रात्री ८ तास अशा दोन टप्प्यांमध्ये चक्राकार पध्दतीने रात्री १० वाजल्यापासून ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत अखंडित वीजपुरवठा करण्यात येत आहे. विजेच्या उपलब्धतेत सुधारणा होताच कृषीपंपांना दिवसा ८ तास व रात्री १० तास वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येईल, असे महावितरणने स्पष्ट केले आहे. विजेची उपलब्धता वाढविण्यासाठी महावितरण सर्वतोपरी प्रयत्न करीत असून लघु निविदेद्वारे खुल्या बाजारातून वीज खरेदी करण्यात येत आहे. या शिवाय पॉवर एक्सचेंजमधूनही वीज खरेदीसाठीचे प्रयत्न सुरू आहेत. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे कोळसा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची माहिती महावितरणने दिली.