दिलीप वळसे पाटील यांचे मत : शिरूरमधील कृषि प्रदर्शनाचे उद्घाटन
शिरूर : कृषी प्रदर्शनातून शेतकर्यांना शेतीविषयक नवनवीन कृषी तंत्रज्ञानाची माहिती व मार्गदर्शन मिळते. शेतकर्यांचे हित लक्षात घेऊन शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीने हे प्रदर्शन आयोजीत केले असून त्याचा लाभ शेतकर्यांना येथे घेता येणार असल्याचे मत विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.
शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती व पुणे जिल्हापरिषदेच्या संयुक्त विद्यमाने शिरूर येथे आयोजीत कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. माजी आमदार अशोक पवार, पोपटराव गावडे, सूर्यकांत पलांडे, जिल्हा सदस्य राजेंद्र जगदाळे, रेखा बांदल, संतोष रणदिवे, रविंद्र काळे, विश्वास कोहकडे आदींसह शिरूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी, शेतकरी, महिला, नागरिक याप्रसंगी उपस्थित होते.
सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला
भाजप सरकारने साडेचार वर्षात फक्त घोषणा देण्याचे काम केले असून शेतकर्यांच्या शेतमालाला बाजारभाव नसल्याने पिक काढणीलादेखील परवडत नाही. सर्वच बाबतीत हे सरकार अपयशी ठरले आहे. फक्त घोषणाबाजी करायची आणि थोड्याफार लोकांना लाभ दिला की त्याचा मोठ्या प्रमाणात प्रचार करण्याचे काम भाजप सरकार करत असल्याचा आरोप करून निवडणुका जवळ आल्या असल्याने सरकार शेतकर्यांसाठी काही करेल असे वाटत नसल्याचे माजी आमदार अशोक पवार यांनी सांगितले. शेतकर्यांचे भरून न येणारे नुकसान साडेचार वर्षात या सरकारने केले असल्याने थापा मारून गाजर दाखवून लोकांची फसवणूक करून भ्रमनिरास करण्याचे काम या सरकारने केले असल्याची टिका यावेळी बोलताना पवार यांनी केली.
तीन कोटींचे कर्ज फेडले
शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे काम अतिशय चांगले चालले असून माजी आमदार अशोक पवार, बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संचालक मंडळ चांगले काम करत असल्याने दिड वर्षात तीन कोटी रूपयांचे कर्ज फेडून चांगल्या दिशेने बाजार समितीचे काम चालले असल्याचे मत माजी आमदार पोपटराव गावडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. प्रस्ताविक सभापती शशिकांत दसगुडे यांनी केले तर आभार संचालक विकास शिवले यांनी मानले व सूत्रसंचालन संदिप सरोदे यांनी केले.