जळगाव । कृषि यांत्रीकी दिनानिमित्त कृषि विज्ञान केंद्र ममुराबाद येथे शुक्रवार 10 फेब्रुवारी रोजी संशोधक शेतकर्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला असून यानिमित्त दिवसभर चर्चासत्रे, प्रात्यक्षिके, अवजारांचे प्रदर्शन व शेतकरी मेळावा असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, शेतकर्यांनी शेतीत जास्तीत जास्त यंत्रे व कृषी अवजारांचा वापर करावी हा उद्देश ठेऊन आपल्या देशाचे पंतप्रधान यांच्या संकल्पनेनुसार भारतीय कृषी अनुसंधान परीषद व नवी दिल्ली अंतर्गत येणार्या व कृषी विद्यापीठात असणार्या अखिल भारतीय समन्वयीत कषि अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्पामार्फत देशभरात एकाच दिवशी कृषि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे यांनी दिली आहे.
कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद फार्म येथे होणार कृषी प्रदर्शन
जळगाव जिल्ह्यातही कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद फार्म, जळगाव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, कृषी विभाग, जळगाव महाराष्ट्र शासन, आत्मा, जळगाव तसेच कृषी अवजारे उत्पादक संघटना (एआयएमए, महाराष्ट्र) यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार १० फेब्रुवारी २०१७ ला ‘कृषी यांत्रिकीकरण दिवस’ साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त संशोधक शेतकर्यांचा मेळावा घेण्यात येणार असून, नाविन्यपूर्ण अवजारांचे स्टाल्स व प्रात्यक्षिके, चर्चासत्र आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सदर कार्यक्रम कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद फार्म, जळगाव येथे सकाळी १० वा. होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल या उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरीचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. किरण कोकाटे हे राहणार आहेत.
विविध पिकांवर मार्गदर्शन
यावेळी तज्ज्ञ मार्गदर्शक विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. त्यात प्रा. विश्वास देशमुख हे ‘कृषि यांत्रिकीकरणाची नवी दिशा व वाटचाल’ या विषयावर तर प्रविण आवटे हे ‘महाराष्ट्र शासनाच्या कृषि यांत्रिकीकरणासाठी विविध योजना’, वैभव सूर्यवंशी हे ‘कृषि यांत्रिकीकरणात कृषि विज्ञान केंद्र, ‘ममुराबाद फार्म जळगावचे योगदान’ आणि रविकिरण राठोड हे ‘कृषी अवजारे सेवा केंद्र ग्रामीण तरुणांसाठी आर्थिक उन्नती साधन’ या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. याच कार्यक्रमात आपल्या शेतात संशोधन करुन नवीन अवजारे तयार करणारे व अवजारात आवश्यक बदल करणार्या शेतकर्यांचा सत्कारही करण्यात येणार आहे, अशी माहिती विवेक सोनवणे यांनी दिली.
बळीराजाला आवाहन
यावेळी आत्मा प्रकल्प संचालक शिवाजी आमले, कृषि विद्यापीठ राहुरीचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकासह तुरबतमठ, तेलबिया संशोधन केंद्राचे डॉ. सुदाम पाटील, डॉ. विठ्ठल शेंडे, कृषिभूषण विश्वासराव पाटील, कृषि विकास अधिकारी मधुकर चौधरी, प्रकाश बागुल आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमास शेतकर्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन डॉ. हेमंत बाहेती, प्रा. तुळशीदास बास्टेवाड, के.डी. महाजन उपसंचालक आत्मा आणि कृषि उपसंचालक अनिल भोकरे यांनी केले आहे.