कृषीपंपासाठी शेतकरी आक्रमक

0

निंभोरा । येथील शेतकर्‍यांचे कृषी पंपाच्या थकीत बाकीसाठी कृषी संजीवनी योजनेची मुदत 15 रोजी संपत असून अनेक शेतकर्‍यांची बाकी पैशांअभावी भरली जात नसल्याने व रब्बी हंगाम तोंडावर असल्याने शेतकर्‍यांची वीज कनेक्शन तोडण्यात येऊ नये, त्यांना मुदतवाढ देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन निंभोर्‍यातील शेतकर्‍यांनी कनिष्ठ अभियंता ठाकूर व लाईनमन प्रकाश तायडे यांना दिले.

यांची होती उपस्थिती
यावेळी सरपंच डिगंबर चौधरी, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद बोंडे, कडू चौधरी, गिरधर भंगाळे, नरेंद्र चौधरी, स्वानंद कृषी मंडळाचे अध्यक्ष गिरीश नेहेते, सुधीर मोरे, गुणवंत भंगाळे, सुनिल कोंडे, वसंत कोळंबे, सतीश पाटील, विठ्ठल इंगळे, मनोहर तायडे, कैलास येवले, हेमंत पवार, विजय पवार, नितीन दोडके, प्रमोद भोगे, विजय बोंडे, दिलीप सोनवणे, दस्तगीर खाटीक, किरण सपकाळे यांसह अनेक शेतकर्‍यांनी यावेळी उपस्थिती दिली. तसेच थकीत वीज बिलपोटी वितरण कंपनीने किंवा कर्मचार्‍यांनी दमदाटी तसेच कनेक्शन कापण्याची भूमिका घेतल्यास सर्व शेतकर्‍यांच्या रोषास सामोरे जावे लागेल, असा इशारादेखील देण्यात आला. यावेळी कनिष्ठ अभियंता ठाकूर यांनी शेतकर्‍यांच्या भावना आपल्या वरीष्ठांपर्यंत पोहोचवू, असे संबंधित शेतकर्‍यांना आश्‍वासन दिले.

50 टक्के सरसकट माफीची मागणी
2014 साली वीज वितरणतर्फे 50 टक्के थकीत बिलात माफी देण्यात आली होती. कृषी संजीवनी योजनेनुसार व्याज व दंड माफी करण्यात यावी तसेच ग्राहकांना लावायचे व्याज व माफ होणारे व्याज यात बरीच तफावत आहे. त्यामुळे वीज कनेक्शन कापण्याचा प्रयत्न झाल्यास शेतकरी आंदोलन छेडतील, असा इशारा देण्यात आला.

आमदार जावळेंकडे मांडली व्यथा
यावेळी निवेदनाबाबत सरपंच डिगंबर चौधरी यांनी आमदार हरिभाऊ जावळे यांच्याशी संपर्क साधत शेतकर्‍यांना वीज बिल भरण्यासंदर्भात येत असलेल्या अडचणी सांगितल्या. यावरुन आमदार जावळे यांनी ऊर्जामंत्री चंंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संपर्क साधत कृषी संजीवनी योजनेची मुदतवाढ करण्याची मागणी केली असून तोपर्यंत वीज बिल थकबाकीदार असलेल्या शेतकर्‍यांचे कनेक्शन कापण्यात येऊ नये, अशी मागणीही केल्याचे आमदार जावळे यांनी सांगितले. त्यामुळे वीज वितरण प्रशासन काय भुमिका घेते? याकडे परिसरातील शेतकर्‍यांचे लक्ष लागून आहे.

रात्रीचा पुरवठा बंद करा
वीज वितरणतर्फे शेतकर्‍यांना देण्यात येत असलेले वीजबिल हॉर्सपॉवर किंवा रीडिंगनुसार नसतात तर व्याज भरमसाट आकारले जाते. एकाच हॉर्सपॉवरचे वेगवेगळे बिल येतात यामुळे शेतकर्‍यांवर अन्याय होत असून आठवडाभर रात्रीचा पुरवठा बंद करून जुन्या पूर्वीच्या वेळेवरच वीजपुरवठा देण्यात यावा अशा 10 ते 12 मागण्यांचे निवेदन शेतकर्‍यांच्या वतीने देण्यात आले.